लस मिळाल्यावरही पुढील वर्षभर जनजीवन पूर्वपदावर येणार नाही : अमेरिकेचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ अँथोनी फॉसी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी सातत्याने वाढत आहे. जगभरात भारत, ब्राझील, अमेरिकेमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. रुग्ण वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वेगाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. जगभरातील अनेक संशोधक कोरोना विरुद्ध लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना विरुद्धची लस कधी येते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे कोरोनावरील लस आली तरी पुढील 2021 वर्षाच्या अखेरपर्यंत जनजीवन विस्कळीत राहणार असल्याचे अमेरिकेचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ अँथोनी फॉसी यांनी सांगितले आहे.

फॉसी यांनी एका वेबिनारमध्ये बोलताना सांगितले की, कोरोनापूर्व काळासारखे जनजीवन होण्यास बराच कालावधी लागणार आहे. पुढील वर्षाअखेरही सामान्य जनजीवन पूर्वपदावर येणार नाही. कोरोनाची लस विकसित झाल्यानंतर संपूर्ण जग पूर्वपदावर येईल असे अनेकांना वाटते. परंतु, ज्या वेगाने जग पूर्ववत होईल असे वाटत आहे. तसे बिलकूल होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेत लस वापराला कधी मिळणार मंजुरी ?
जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. अमेरिकेत सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अमेरिकन अन्न व आणि औषध प्रशासनाकडून या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या काळात लशीच्या आपात्कालीन परिस्थितीत लस वापराला मंजूरी मिळू शकते अशी माहिती फॉसी यांनी दिली. मात्र सर्वांनाच ही लस तात्काळ उपलब्ध होणार नाही. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या लशीकरण मोहिमेसाठी बराच कालावधी लागणार आहे.

दरम्यान, ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आमि एस्ट्राजेनका विकसित करत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लशीची चाचणी पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. ब्रिटनमधील औषधे आणि आरोग्य सेवा उत्पादने नियामक प्राधिकरणाने संपूर्ण तपासणी केली. त्यानंतर क्लिनिकल चाचणीला हिरवा झेंडा दाखवला आहे. लस टोचलेल्या एका स्वयंसेवकाच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने चाचणी थांबवण्यात आली होती.