उत्तर व दक्षिण कोरियामध्ये प्रचंड तणाव, उत्तर कोरियानं संपर्क कार्यालय उडवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया यांच्यातील सीमेवर निर्लष्करी भागात असलेल्या संपर्क कार्यालयाची इमारत उत्तर कोरियाने उडवून दिली आहे. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची बहीण यो जोंगने दक्षिण कोरियाला थेट युद्धाची धमकी दिल्यानंतर काही तासांतच उत्तर कोरियाने ते संपर्क कार्यालय बॉम्ब टाकून उडवून दिलं आहे. याच कार्यालयात दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच एकत्र काम केलं होत, पण उत्तर कोरियाने पुन्हा एकदा दक्षिण कोरियाशी शत्रुत्व निर्माण केले असून, दोन्ही देशातील संबंध तोडण्याची धमकी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीमेवरील केसॉंग भागातील दक्षिण कोरियाची इमारत दुपारी २.४९ वाजता उध्वस्त करण्यात आली असून, या इमारतीतून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. मागील काही दिवसांपासून उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कारवाईची धमकी उत्तर कोरियाकडून वारंवार देण्यात येत होती. सीमेच्या परिसरात सामरिक हालचाली आणि कथित दुष्प्रचार करणे दक्षिण कोरियाने थांबवले नाही, असा आरोप उत्तर कोरियाने केला आहे.

सुरु असलेल्या तणावाचा ताजा इतिहास
गेल्या काही महिन्यांपासून दक्षिण कोरियाच्या हद्दीतून उत्तर कोरियाविरुद्ध संदेश देणारे फुगे तसेच पत्रके वाटण्यात येत आहे. उत्तर कोरियामधून पळून गेलेल्या काही नागरिकांकडून हे कृत्य केलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. पत्रके वाटणाऱ्या तसेच फुगे सोडणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी किम जोंग यांची बहीण यो जोंगने दक्षिण कोरियाकडे केली होती. परंतु, त्याकडे दक्षिण कोरियाने साफ दुर्लक्ष केलं. म्हणून संतापलेल्या किम यो यांनी थेट युद्धाचीच धमकी दिली होती.

किम यो यांची निर्णायक भूमिका
दक्षिण कोरियासंदर्भात संबंधाचे निर्णय घेण्यासाठी किम यो यांची निर्णायक भूमिका असते. त्यामुळे त्यांनी दिलेल्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे. किम यो यांनी म्हटलं, ‘आम्ही थेट कारवाईच करणार आहे. आमचे सर्वोच्च नेते, आमचा पक्ष, आमचा देश आणि मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन शत्रूवर कारवाईचे आदेश देतं आहोत.

तणावामागची कारणे
१. उत्तर कोरियामध्ये सुरु असलेल्या अणवस्त्र कार्यक्रम आणि मानवाधिकाऱ्याच्या मुद्यावरून किम उन जोंग यांच्यावर सातत्याने टीका केली जाते.

२. उत्तर कोरियातील अनेक कार्यकर्त्यांनी किम यांच्या सत्तेला कंटाळून दक्षिण कोरियात आश्रय घेतला आहे. हे कार्यकर्ते म्हणजे शत्रूंच्या भूमीवरील किडे असून, त्यांनी मायदेशासोबत गद्दारी केली आहे. त्यांचे मालक असलेल्या दक्षिण कोरियाला धडा शिकवण्याची वेळ असल्याचं यापूर्वी किम यो यांनी म्हटलं होतं.

३. किम जोंग उन यांच्यानंतर कोरियाच्या राजकारणावर किम यो जोंग यांची पकड असणार असल्याचं बोललं जात. किम यांच्या अनेक निर्णयामागे किम यो यांची भूमिका असल्याचं सांगितलं जात.