‘तानाशाह’ किंम जोंग उनला वाटतेय ‘कोरोना’ची भीती, ‘हुकूमशहा’च्या बैठकीची Inside Story बाहेर !

गयाँग : वृत्तसंस्था – जगातल्या 200 देशांमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जगभरात 70 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या कोरोनाच्या विळख्या सापडली आहे. असे असताना मात्र उत्तर कोरिया हा देश अजून कोरोनामुक्त असल्याचा दावा करत आहे. आता या दाव्यावरच प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. हुकूमशाह किम जोंग उनच्या एका बैठकीची माहिती आणि फोटो बाहेर आले आहेत. या फोटोंबाबत आता शंका उपस्थित केली जात आहे. किम उन याला कोरोनाची भीती वाटत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

किम जोंग याने नुकतीच सत्तारुढ पक्षाच्या पॉलिट ब्युरोची एक बैठक घेतली होती. त्या बैठकीचं वृत्त सरकारी KCNA या वाहिनीने दिलं. त्यासोबत काही फोटोही प्रसिद्ध केले आहेत. त्यानंतर या चर्चेला जगभरात सुरुवात झाली आहे. या बैठकीत किम जोंग हे वेगळे बसलेले दिसत आहेत. त्याचबरोबर इतर लष्करी आणि मुलकी अधिकारी हे त्यांच्यापासून काही अंतरावर बसलेले दिसत आहेत. त्यामुळे उत्तर कोरियातही कोरोनाचा शिरकाव झाला असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

यापूर्वी किम जोंग यांच्या प्रकृती विषयी अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. एवढेच नाही तर त्यांच्या मृत्यूची अफवा देखील पसरली होती. कारण किम जोंग अनेक दिवस कोणालाच दिसले नव्हते. त्यानंतर ते एका कार्यक्रमात दिसून आले. किम जोंग यांनी सध्या कोरोनाची सर्वात जास्त भीती वाटत असून ते जाणार असलेल्या ठिकाणी खास काळजी घेत आहेत, अशीही महिती समोर आली आहे. उत्तर कोरियाची मोठी सीमा चीनला लागून आहे. त्यामुळे उत्तर कोरियातही कोरोनाने शिरकाव केला असावा मात्र त्याबद्दल माहिती बाहेर येऊ दिली जात नसल्याचे बोलले जात आहे.