परदेशी रेडिओ ऐकला म्हणून जहाजावरील कॅप्टनची हत्या

प्योंगयांग : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या सणकीपणाचे अनेक किस्से जगप्रसिद्ध आहेत. त्यांचीच सणकी वृत्ती त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये देखील पूरेपूर भिनल्याचा प्रत्यय नुकताच आला. एका अधिकाऱ्याने नुकतेच परदेशी रे़डिओ ऐकला म्हणून एका जहाजाच्या कॅप्टनची सर्वांसमोर गोळी घालून हत्या केली.

चोई असे हत्या झालेल्या कॅप्टनचे नाव आहे. ‘रेडिओ फ्री एशिया’ (RFA) ने दिलेल्या वृत्तानुसार, चोई हा 50 जहाजांचा मालक होता. त्याच्या एका स्टाफने बंदी घातलेल्या रेडिओचे प्रसारण तो ऐकत असल्याची माहिती लष्कराला दिली. त्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांने सर्व स्टाफ समोर त्याची गोळ्या झाडून हत्या केली. चोई हा पूर्वी लष्करात रेडिओ ऑपरेटर होता. उत्तर कोरियाच्या नियमानुसार लष्कराची नोकरी सोडलेल्या अधिकाऱ्यांना या रेडिओच प्रसारण ऐकता येत नाही. या प्रकरणानंतर त्या भागात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांची देखील हकालपट्टी केली आहे. या सर्वांची आता चौकशी सुरु करून उत्तर कोरियातील नियमांप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. या अधिकाऱ्यांवर चोईच्या अपराधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी त्याच्याकडून कोणती लाच स्विकारली होती का? याचीही चौकशी केली जाणार आहे.

इतरांना इशारा देण्यासाठी चोईची हत्या
चोईचे जहाजातील कर्मचाऱ्यांशी पटत नव्हते, त्यामुळेच त्याची तक्रार लष्करी अधिकाऱ्याकडे करण्यात आली, अशी माहिती देखील आता उघड झाली आहे. उत्तर कोरियात कोणत्या विदेशी रेडिओचे प्रसारण ऐकाव याची किम जोंग सरकारन कडक नियमावली केली आहे. सरकारच्या या नियमांच उल्लंघन करुन अनेक नागरिक छुप्या पद्धतीन विदेशी रेडिओ ऐकतात. या सर्वांना कडक इशारा देण्यासाठी चोईची हत्या केल्याचे बोलले जात आहे.