उत्तर कोरियामध्ये ‘कोरोना’चं पहिलं प्रकरण, दक्षिण कोरियातून अवैधरित्या आलेल्या व्यक्तीमध्ये आढळली लक्षणं

पोलीसनामा ऑनलाईन टीम : संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असताना जगात असे काही देश होते जिथं कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. त्यातलाच एक देश उत्तर कोरिया होता. पण आता कोरोनाने उत्तर कोरियातही प्रवेश केला आहे. उत्तर कोरियातूनही याला दुजोरा आला आहे. अवैधरित्या दक्षिण कोरियातून उत्तर कोरियात आलेल्या एका रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत.

उत्तर कोरियाच्या सरकारी केसीएनए या सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हा रुग्ण आढळल्यानंतर बॉर्डरजवळील केसोंग या शहरात लॉकडाउन जाहीर केलं आहे. माहितीनुसार, कोरोनाचा जो रुग्ण आढळला आहे तो 3 वर्षांपूर्वी दक्षिण कोरियात पळून गेला होता आणि आता अवैधरित्या माघारी उत्तर कोरियात आला आहे.

केसीएनएच्या माहितीनुसार उत्तर कोरियात सध्या काही भागांत आणीबाणी लागू केली आहे. हा उत्तर कोरियातील पहिला कोरोनाचा रुग्ण ठरला आहे. हा व्यक्ती केसोंग शहरात ज्यांच्याज्यांच्या संपर्कात आला आहे त्यांची शोधाशोध करून त्यांना कोरंटाईन केलं जातं आहे. हा व्यक्ती कसा काय उत्तर कोरियात आला याचा तपास करण्याचे आदेश किम जोंग उनने दिले आहेत. उत्तर कोरियात जानेवारी महिन्यातच कोविड-19 विरोधात देशाच्या सगळ्या सीमा बंद केल्या होत्या. कोरंटाईनचे नियमही कडक केले होते. केसोंग शहराची लोकसंख्या 2 लाख आहे. त्यामुळे आता उत्तर कोरियानेही चांगलीच काळजी घ्यायला सुरुवात केली आहे.