मृत्यूबाबत उलट-सुलट चर्चा चालु असतानाच पहिल्यांदा समोर आले उत्तर कोरियाचे ‘तानाशाह’ किम जोंग उन, फोटो ‘व्हायरल’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा होती. मात्र शुक्रवारी ते जगासमोर आले. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार किम यांनी राजधानी प्योंगयांगजवळ सुनचिओन येथे खत कंपनीचे उद्घाटन केले. गेल्या एक महिन्यापासून त्याच्या तब्येतीविषयी आणि मृत्यूबद्दल अनेक अनुमान आणि दावे केले जात होते पण जवळपास तीन आठवड्यांनंतर ते पुन्हा सार्वजनिक ठिकाणी दिसले.

11 एप्रिल रोजी पॉलिटब्युरोच्या बैठकीनंतर किम हजर झाले नाहीत, त्यानंतर त्यांच्याबद्दल अनेक प्रकारचे कयास लावण्यात आले होते, पण आता तेथील मीडियाने सर्व प्रकारच्या उलटसुलट चर्चांना बंद करण्यासाठी त्यांची काही छायाचित्रे शेअर केली आहेत.

हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर किम यांच्या प्रकृतीबद्दल अनेक माध्यमांतील वेगवेगळ्या वृत्तांमुळे चर्चांना उधाण आले होते. त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त देखील समोर आले होते. परंतु आता उत्तर कोरिया प्रशासनाकडून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे.