जगात फोफावलेल्या ‘महामारी’ दरम्यानच उत्तर कोरियानं समुद्रात केलं ‘बॅलिस्टिक’ मिसाईलचं ‘परिक्षण’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे संपूर्ण जग कोरोना व्हायरसचा सामना करत आहे तर दुसरीकडे उत्तर कोरियाने रविवारी दोन संशयित बॅलॅस्टिक क्षेपणास्त्रांचे समुद्रात परीक्षण केले. या चाचणीवर आक्षेप दाखवत दक्षिण कोरियाने याला पूर्णपणे अनुचित म्हटले आहे.

दक्षिण कोरियाचे जॉईंट चीफ ऑफ स्टाफने म्हटले, ‘रविवारी उत्तर कोरियाचे पूर्वेकडील किनारी शहर वोनसन येथून येणारी क्षेपणास्त्रे कोरियन प्रायद्वीप आणि जपानमधील समुद्रात पडताना दिसली. त्यांची जास्तीत जास्त उंची ३० किलोमीटर होती आणि समुद्रात पडण्या आधी या क्षेपणास्त्रांनी जवळजवळ २३० किलोमीटरचे अंतर व्यापले होते. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेचे गुप्तचर अधिकारी या परीक्षणावर लक्ष ठेवून आहेत. दक्षिण कोरियाच्या लष्कराने याला अनुचित असल्याचे सांगत उत्तर कोरियाच्या या महामारीच्या काळात परीक्षण थांबवण्याचा आग्रह केला आहे.

काही दिवस आधी उत्तर कोरियाने काही क्षेपणास्त्रांचे परीक्षण केले होते. अमेरिकेबरोबर रखडलेली वार्ता पुन्हा सुरू करण्यासाठी दबाव म्हणून याच्याकडे पाहिले जात आहे. गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने माहिती दिली होती की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तानाशाह किम जोंग-उन यांना दोन्ही देशांमधील चांगले संबंध टिकवून ठेवण्यासाठी आणि साथीच्या प्रादुर्भावाविरुद्ध लढा देण्यासाठी सहकार्य करण्याच्या उद्देशाने पत्र लिहिले होते. उत्तर कोरिया असा दावा करत आहे की, त्यांच्या देशात कोरोना व्हायरसचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. पण तज्ञांचे म्हणणे आहे की, उत्तर कोरिया जगाला सत्य सांगत नाहीये.