Coronavirus : जगभरातील ‘या’ 15 देशात अद्याप ‘कोरोना’ पोहचलेला नाही

वॉशिंगटन :  वृत्तसंस्था –   जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जगभरातील लाखो लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर हजारो लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. जगभरातील 180 देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र असे असले तरी जगभरातील 15 असे देश आहेत या देशांमध्ये अद्याप कोरोना पोहचलेला नाही. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीत कोरोना विषाणूचा जगभरातील डेटाबेस तयार करण्यात येत आहे. याचा उपयोग जगभरातील अनेक प्रसारमाध्यमांना आणि सरकारांना होत आहे.

विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणू आतापर्यंत जगातील 180 देशांमध्ये पोहोचला आहे. परंतु असे काही देश आहेत ज्या ठिकाणी कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. यामध्ये उत्तर कोरियाचा समावेश आहे. किम-जोंग-उन सरकारचे म्हणणे आहे, त्यांच्याकडे आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. परंतु, उत्तर कोरियाच्या सीमेवर चीन आणि दक्षिण कोरिया सारखे असे देश आहेत, की या देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले असून अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या 31 मार्चच्या आकडेवारीनुसार आफ्रिका खंडातील अनेक असे देश आहेत जिथे अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. बोत्सवाना, तुर्कमेनिस्तान, तजाकिस्तान, येमन, कोमोरोस, मलावी, साओ टोमे आणि प्रिन्सिपे, दक्षिण सुदान हे एकमेव देश आहेत जिथे कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. याव्यतिरिक्त सोलोमन, आईसलँड, वानुआटु अशी बेटे देखील कोरोनाच्या संक्रमणापासून वाचली आहेत.

उत्तर कोरियाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

उत्तर कोरियाने आपल्या देशात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसल्याचा दावा केला आहे. मात्र, काही तज्ज्ञांनी उत्तर कोरियाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तर काहींनी याला पाठिंबा दर्शवला आहे. असेही म्हटले जाते की, हा देश इतर देशापासून वेगळा असून त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. सध्या जगातील सर्वच देश कोरोनाचा सामना करत असताना किम जोंग हे क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात व्यस्त आहेत.

जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 8 लाखाच्यावर

कोरोना विषाणूमुळे जगभरात 8 लाख 60 हजार 106 जणांना लागण झाली आहे. तर 42 हजार 334 जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूने 180 देशांना विळखा घातला आहे. कोरोनामुळे अमेरिकेत 4055 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 88 हजार 592 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेच्या खालोखाल इटलीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 5 हजार 792 वर पोहचली आहे. तर मृतांची संख्या 12 हजार 428 झाली आहे.