Norway : लस टोचल्यानंतर 13 जणांचा मृत्यू; नॉर्वेमध्ये प्रचंड खळबळ

नॉर्वे : वृत्तसंस्था – जगातील अनेक देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतातही शनिवार (दि.16) पासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, नॉर्वेत फायजरची व्हॅक्सिन टोचल्यानंतर 13 जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नॉर्वेच्या मेडिसिन एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 13 वृद्धांवर व्हॅक्सिनचे गंभीर दुष्परिणाम झाले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. नॉर्वेच्या इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थने सांगितले की,’दुर्धर आजार असलेल्या लोकांवर लशीचे गंभीर परिणाम होऊ शकतात. नॉर्वेमध्ये आतापर्यंत 33 हजार लोकांना व्हॅक्सिन दिले आहे. नार्वेमध्ये सध्या अशा लोकांकडे लक्ष दिले जात आहे, ज्यांना कोरोनाचा अधिक धोका आहे. यापैकी बहुतांश लोकांना बायोएनटेक, फायजर व्हॅक्सिन दिली आहे. याशिवाय मॉडर्नाची व्हॅक्सिनही दिली आहे. दरम्यान नॉर्वेच्या मेडिसिन एजन्सीचे मेडिकल डायरेक्टर स्टीनर मॅडसन यांनी सांगितले की, आम्हाला याची माहिती घ्यावी लागेल की व्हॅक्सिनमुळे त्यांचा मृत्यू झाला की हा फक्त योगायोग आहे

दोन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची चौकशी सध्या नॉर्वेमध्ये सुरु आहे. या दोघांनाही फायजर आणि बायोएनटेकची लस दिली होती. मॅडसन असेही म्हणाले की, वृद्धांना कोरोना व्हॅक्सिन दिले होते. त्यांचा मृत्यू हा एक योगायोगही असू शकतो. याआधी फायजर कंपनीचे सीईओ अल्बर्ट बोरला यांनी म्हटले होते की,व्हॅक्सिन घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग रोखता येईल की नाही हे सांगता येणार नाही.