आश्चर्यम ! ‘त्याला’ कानाने नाही, तर नाकाने येते ऐकू !

भोपाळ : वृत्तसंस्था – आपल्या शरीराच्या प्रत्येक अंगाचे काम ठरलेले आहे. डोळे पाहतात, कान ऐकतात, तर नाक गंध ओळखतो. परंतु एखादा तरूण नाकाने ऐकतो असे जर तुम्हाला सांगितले तर तुम्ही काय विचार कराल? एका तरुणाने असा दावा केला आहे की, त्याला कानाने नाही तर चक्क नाकाने ऐकू येतं. या कारणामुळे तो राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. मध्य प्रदेशमधील बडवानी जिल्ह्यातील बंधनपुरा या छोट्याशा गावात राहणाऱ्या या तरुणाचं नाव ‘टिल्लू’ आहे. तो मोबाईलवर कोणाशी बोलताना मोबाईलही नाकाजवळ धरून पलीकडच्या व्यक्तीशी बोलतो. परंतु असे काही होणे शक्य नसल्याचे नाक, कान, घसा तज्ज्ञांनी म्हटले आहे.

टिल्लूने केलेल्या दाव्यानंतर मात्र टिल्लूला पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून आणि राज्यातून लोक बंधनपुरामध्ये येऊ लागले. टिल्लूच्या ‘असामान्य क्षमते’ ची माहिती संपूर्ण बडवानी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. टिल्लूबाबत सांगताना, टिल्लू हा लहानपणापासूनच कर्णबधिर असून, त्याला ऐकायला येत नव्हते, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी अचानकच टिल्लूला कानाऐवजी नाकातून ऐकायला यायला लागले! त्यानेही सगळ्यांना याच पद्धतीने आपल्याला ऐकायला येत असल्याचे सांगितले.

आपण कानाऐवजी नाकाने ऐकतो आहोत हे लक्षात आल्यानंतर टिल्लूला सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला. पण, नंतर त्याने शरीराला त्याची सवय लावली. मग हळूहळू तो नाकानेच समोरच्याचे म्हणणे ऐकण्याचा प्रयत्न करू लागला. याबाबत बोलताना टिल्लूने त्याला, नाकाजवळ मोबाईल धरला तर आपल्याला समोरच्या व्यक्तीचे एकदम व्यवस्थित ऐकायला येत असल्याचे सांगितले. टिल्लूचा दावा ऐकून  ऐकावे ते नवलच, दुसरे काय? अशी भावना व्यक्त करत आहेत.