शिक्षणामध्ये खासगी कंपन्यांचा शिरकाव रोखणार : शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणातील संधी पाहून खासगी कंपन्यांनी उपयोजने ई -साहित्याचा पुरवठा सुरू केला आहे. मात्र, खासगी कंपन्यांचा शिक्षणात शिरकाव होऊ देणार नसल्याची भूमिका शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी घेतली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्व शैक्षणिक साहित्य, आशय तपासणी करूनच वापरला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शिक्षणाची संकल्पनाच बदलली आहे. त्यामुळे केवळ पाठ्यपुस्तकांवर आधारित शिक्षणापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना जीवनकौशल्ये शिकवणे, त्यांची कौशल्यवृद्धी करणेही महत्त्वाचे आहे. शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने केंद्र प्रमुख, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ यांच्यापासून प्रत्येक घटकाशी चर्चा करण्यात आली. मात्र, प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. अनेक शाळा विलगीकरणासाठी वापरल्या जात आहेत. शिक्षकही कोरोनाच्या कामात व्यग्र आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत शाळा सुरू करणे अवघड आहे.

आतापर्यंत पाठयपुस्तकांचे वितरण 95 टक्के झाले आहे, तर बालभारतीच्या संकेतस्थळावरून आतापर्यंत 1 कोटी 51 लाख डाउनलोड्स झाले आहेत. सर्वच विद्यार्थी, पालकांकडे संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन नसल्याने दूरदर्शन, रेडिओ, व्हॉट्स अ‍ॅप माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर वेळ मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. केंद्राने स्वयंप्रभा वाहिनी उपलब्ध करून दिली आहे. जिओ टीव्हीवर ज्ञानगंगा या तीन वाहिन्या सुरू केल्या आहेत.

आणखी सहा वाहिन्या सुरू केल्या जाणार आहेत. तसेच गुगल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इंटरअ‍ॅक्टिव्ह शिक्षण दिले जाईल. शासनाने तीन महिन्यांचे शैक्षणिक वेळापत्रक तयार केले आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.