खासगी शाळांतील शिक्षकांना मोठा दिलासा, यापुढे ‘इलेक्शन ड्यूटी’ नाही : निवडणूक आयोग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खासगी शाळांतील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता खासगी शाळांतील शिक्षकांना इलेक्शन ड्यूटीसाठी बोलावलं जाणार नाही. कारण त्यांना इलेक्शन ड्यूटी नाही अशी कबूली निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालायात दिली आहे. परंतु अनुदानित शाळांतील शिक्षकांना निवडणूकीच्या कामकाजासाठी बोलविले जाणार आहे. असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

निवडणूकीच्या कामासाठी सरकारी कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकांनाही इलेक्शन ड्य़ूटी लावली जाते. नियमानुसार सरकारी अनुदान घेणाऱ्या अनुदानित शाळांतील शिक्षकांनाच इलेक्शन ड्यूटीसाठी पाचारण करता येऊ शकते. असे असतानाही निवडणूक आयोग अनुदानित शाळांतील शिक्षकांसोबत विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनाही इलेक्शन ड्यूटीला जुंपते. हे चुकीचे आहे असा आरोप करत विनाअनुदानित शाळा महासंघाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

खासगी शाळांची नोंदणी सरकारदरबारी असते. तसेच कंपन्यांतील कर्मचाऱ्यांपेक्षा शिक्षक हुशार असतात. त्यामुळे खासगी शाळांतील शिक्षकांना निवडणूक कामासाठी बोलवले जाते. त्यावेळी केवळ खासगी शाळांतील शिक्षकांनाच का? सरकारदरबारी नोंद असलेल्या खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाही या कामासाठी का बोलावले जात नाही. असा सवाल न्यायालयाने विचारला होता.

त्यावर आयोगाने बुधवारी आपले स्पष्टीकरण देत इलेक्शन ड्य़ूटी खासगी शाळांतील शिक्षकांना लागू होत नाही. परंतु यापुढे केवळ अनुदानित शाळांतील शिक्षकांनाच निवडणूकीच्या कामासाठी बोलविण्यात येईल अशी कबूली दिली.