सरकारी नको तर खासगी डॉक्टरकडे ड्रायव्हरचे डोळे तपासा; केंद्रीय मंत्री गडकरींचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना ‘सल्ला’

पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी रस्ते सुरक्षेसाठीच्या उपायांवर जोरदार वकीली केली. त्यांनी बोलता बोलता संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांना एका अपघाताची आठवण करून देत एक महत्वाचा सल्ला देखील दिला. ते म्हणाले, मी सर्व मंत्र्यांना सांगणार आहे आणि राजनाथ सिंहांना विनंती करतो की, जे काही मी अनुभवले त्यावरून तुम्ही तुमच्या चालकांच्या डोळ्याची चाचणी एका खासगी डॉक्टरकडून करून घ्यावी. सरकारी नको. त्याच्या डोळ्यांना काही समस्या असेल तर तो सारे काही ठीक असल्याचे सर्टिफिकेट घेऊन येतो, असे गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारी डॉक्टरांवर रोख धरला.

देशभरात रस्ते सुरक्षा महिना पाळला जाणार आहे. याच्या शुभारंभासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ आदी उपस्थित होते. त्यावेळी गडकीर म्हणाले, महाराष्ट्रात विरोधीपक्षनेता असताना मी लाल दिव्याच्या वाहनातून जात होतो. माझ्यासोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा, ताफा होता. तरीही माझ्या कारला अपघात झाला. नंतर चौकशीत समजले की माझ्या कार चालकाला मोतीबिंदू होता. एका मुख्यमंत्र्यांच्या कारचा चालक दोन्ही डोळ्यांनी जवळपास अंध होता. एका केंद्रीय मंत्र्याच्या चालकाचा एक डोळाच निकामी झाला होता, असे गडकरी यांनी सांगितले. तसेच 2025 पर्यंत रस्ते अपघातात मरणाऱ्यांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करायची आहे. सध्या दररोज 415 लोक रस्ते अपघातात मृत होत आहेत. जर अपघातांवर रोख लावली नाही तर 2030 पर्यंत अपघाती मृत्यूंची संख्या 6 ते 7 लाख होईल अशी भीती गडकरी यांनी व्यक्त केली.