‘कमळ नाही तर बाण’ आमदार अब्दुल सत्तारांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाई – सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असतानाच त्यांनी गणेश चतुर्थीचा महुर्त साधून शिवसेनेत प्रवेश केला. सत्तार यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. रविवारी तातडीने विमानाने मुंबईला रवाना झालेले सत्तार हे भाजपा सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. लोकसभा निवडणुकीदरम्यान सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली होती. त्यामुळे सत्तार हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला असतानाच आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून सर्वांना धक्का दिला.

आज दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशानंतर बोलाताना उद्धव ठाकरे म्हणाले, अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही. त्यांनी विचार करून हा निर्णय घेतला असून शिवसैनिक म्हणून ते मराठवाड्यात काम करणार आहेत.

शिवेसेनेत प्रवेश केल्यानंतर सत्तार म्हणाले, मागील पाच वर्षापासून शेतकऱ्यांच्या पीकवीमा, कर्जमाफी संबंधीत प्रश्नांवर शिवसेना राज्यात काम करीत आहे. मी काँग्रेसमध्ये असताना विरोधी पक्ष म्हणून ती आमची जबाबदारी होती. पण ती जबाबदारी सत्तेत असतानाही शिवसेनेने पार पाडल्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त