अरविंद केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. प्रचारासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. या दरम्यान, भाजप नेत्यांकडून सातत्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला जात आहे. भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांना दहशतवादी म्हणून संबोधले होते. त्यात आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही त्याचा पुनरुच्चार करत केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, जावडेकर यांच्या या विधानावर आपकडून संताप व्यक्त केला जात असून यासंबंधी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी पक्षाने केली आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश जावडेकर यांनी केजरीवाल यांच्यावर थेट हल्लाबोल केला. केजरीवाल भाबडा चेहरा करून ‘मी दहशतवादी आहे का?’, असा सवाल विचारत आहेत. त्याचे उत्तर ‘होय’ असे आहे. याचे अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. मी अराजकवादी आहे, असे जाहीर विधान केजरीवाल यांनी केलेले असून अराजकवादी आणि दहशतवादी यात फारसा फरक नसतो, अशा शब्दांत जावडेकर यांनी निशाणा साधला.

दरम्यान, याआधी भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांची तुलना दहशतवाद्यांशी केली होती. एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले कि, ‘केजरीवालांसारखे नटवरलाल, दहशतवादी देशात लपलेले आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढावे की केजरीवालांसारख्या दहशतवाद्यांशी लढावे, असा प्रश्न आम्हाला पडतो.’ वर्मा यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आम आदमी पक्षाने त्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. एवढंच नव्हे तर केजरीवाल यांनी त्या टीकेला प्रत्युत्तर देत म्हटलं कि, ‘मी तुम्हाला मुलासमान वाटत असेन तर झाडू या निशाणीला मतदान करा आणि मी दहशतवादी आहे असे तुम्हाला वाटत असेल तर कमळापुढील बटण दाबा, असे केजरीवाल म्हणाले होते. दरम्यान, शर्मा यांच्या या विधानानंतर जावडेकर यांनीही त्याचा पुनरुच्चार केल्याने दोन्ही पक्षातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.