फक्त ‘सरपंच’च नव्हे तर ‘मुख्यमंत्री’ही जनतेतून निवडायला हवा : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – या सरकारला विकेंद्रीकरण आणि आर्थिक पारदर्शकता नको आहे, असे दिसत आहे. त्यामुळंच ग्रामपंचायत सदस्यांतून सरपंच निवडीची पद्धत आणली जातेय. पण त्यामुळं लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता आहे, असे सांगत फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री देखील थेट जनतेतून निवडून दिले पाहिजेत असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे.

सरपंच निवडीच्या पद्धतीवरून राज्यातील राजकारण तापत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारनं ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडून देण्याची पद्धत बंद करून थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत सुरु केली होती. ही पद्धत बदलण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला आहे. राज्यपालांनी अध्यादेश काढण्यास नकार दिल्याने सध्या नव्या सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी बारगळली आहे. यावरून सरपंच निवडीची कोणती पद्धत योग्य आहे यावर विचारविनीमय सुरु आहे.

गावचा सरपंच ग्रामसभेनेच म्हणजे गावच्या मतदारांनी निवडला पाहिजे. ही खरी लोकशाही. अन्यथा पक्षशाही येऊन लोकशाही धोक्यात येईल. या सरकारला जनतेऐवजी पक्षाच्या हाती सत्ता यावी असे वाटत आहे, असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच निवडला तर आलेला निधी, खर्च याचा हिशेब जनतेला कसा मिळणार ? सरपंच आणि सदस्य राजकीय असल्याने ते जनतेला हिशेब देतील का ? भांडणे मारामाऱ्या होणार नाहीत का ? हा प्रश्न आहे. सरपंच आणि निवडून आलेले सदस्य यांनी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार केला तर त्यांना बडतर्फ कोण करणार ? आज खेड्यांचा विकास पक्ष-पार्टीच्या गट – तटाच्या राजकारणामुळे थांबला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सरकारच्या कामात पारदर्शकता असावी यासाठी पूर्वीच्या भाजप सरकारच्या विरोधात आम्ही दोन वेळा आंदोलनं करुन लोकायुक्त कायदा करण्याचा आग्रह धरला. आता कायद्याचा मसुदाही तयार झाला आहे. भाजप आणि आघाडी सरकारनं हवा तेवढा एकमेकांना विरोध करावा. पण जनतेच्या, राज्याच्या हिताला बाधा येत असेल तर आम्हाला ते सहन होणार नाही, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.