‘वारकर्‍यांना वारी नाही तर उपमुख्यमंत्र्यांनीही वारी करू नये’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी यंदाची कार्तिकी यात्रा रद्द करण्यात आली आहे. कार्तिकी सोहळा यंदा प्रतिकात्मक होणार असून, २६ नोव्हेंबर रोजी पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे. मात्र, या पूजेला आता विरोध दर्शवण्यात येत आहे. वारकऱ्यांना नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पूजा करू नये, अशी भूमिका वारकरी संघटनेने घेतली आहे.

२५ व २६ नोव्हेंबरला पंढरपूरजवळच्या ११ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात वारकऱ्यांना तसेच दिंड्यांना पंढरपुरात बंदी असणार आहे, अशी माहिती शुक्रवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. त्याच पार्श्वभूमीवर कार्तिकी वारी संदर्भात वारकरी संघटनेची भूमिका मांडण्यासाठी महाराज मंडळींनी वार्ताहरांशी संवाद साधला.

त्यावेळी कार्तिकी यात्रेनिमित्त वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यास प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. वारकऱ्यांना विरोध करत उपमुख्यमंत्री कार्तिकीची शासकीय महापूजा कसे करू शकतात. हा दुजाभाव शासनाने करू नये. वारकऱ्यांना वारी नाही, तर उपमुख्यमंत्र्यांनीसुद्धा पूजा करू नये, अशी भूमिका वारकरी संघटनेने घेतली.

त्याचप्रमाणे राज्य सरकारने वारकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. या अनुषंगाने कार्तिकी यात्रा समन्वय समिती येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची सुरुवात येत्या पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून करण्यात येणार आहे. तद्वत, वारकऱ्यांना इतके निर्बंध लावण्यात आले असतील, तर कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या महापूजेस बाहेरून कोणीही न येता ही महापूजा प्रांताधिकारी यांच्या हस्ते करण्यात यावी, असे मत वारकरी संघटनेने व्यक्त केले.