Wakad News : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून टोळक्याचा राडा, वाहनांची केली तोडफोड

वाकड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून सात जणांच्या टोळक्याने कोयते, दांडके हवेत फिरवून परिसरात दहशत पसरवली. तसेच कोयत्याचा धाक दाखवून एकाला जबरदस्तीने लुटले. याशिवाय परिसरात रस्त्याच्याकडेला पार्क केलेल्या वाहनांच्या काचांची तोडफोड केली. हा प्रकार मंगळवारी (दि.12) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास रहाटणी येथे घडला.

विजय तलवारे, ऋषिकेश सूर्यवंशी, राजू उर्फ राजा पठाण, अजय निकम आणि त्यांचे इतर दोन ते तीन साथिदार यांच्या विरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दशरथ तुकाराम भांडे (वय-34 रा. श्रीनगर, रहाटणी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांन दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, भांडे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी कोयत्यासारखी हत्यारे, लोखंडी दांडके हवेत फिरवत मोठमोठ्याने आरडाओरडा केली. तसेच परिसरात रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. आरोपींनी भांडे यांच्या खिशातून जबरदस्तीने एक हजार रुपये काढून घेतले. ‘कोण काय करतंय व कोण मधे येतंय ते बघतोच. त्यांना सोडणार नाही. कोणी मधे आले तर त्यांना खल्लास करु’ अशी धमकी देत गोंधळ घातला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक कादवाने करीत आहेत.