नाशिक मध्ये चक्क ATM मधून नोटांचा ‘पाऊस’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – एटीएममध्ये आपण पैसे काढायला गेल्यावर अनेकदा नेटवर्क न मिळाल्याने व्यवहार अर्धवट पूर्ण होतो व आपल्याला पैसे मिळत नाही़ असे पैसे मिळाले नाहीत याची तक्रार करण्याची पाळी अनेकांवर येत असते. पण येथे एका तरुणाने एटीएमध्ये १०० रुपये काढण्यासाठी आपले डेबिट कार्ड मशीनमध्ये टाकताच पटकन २० हजार रुपयांची रक्कम मशीनमधून बाहेर आले. या प्रकाराने मोलमजुरी करणारा हा तरुण घाबरुन गेला. हा प्रकार नाशिकमधील कलानगर येथील आयडीबीआय बँकेच्या एटीएममध्ये मंगळवारी घडला.

वडाळा गावातील घरकुल वसाहतीत राहणारे पवन विश्वनाथ डोंगरे हा युवक १०० रुपये काढण्यासाठी कलानगर येथील आयडीबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये मंगळवारी दुपारी गेला होता. त्याने आपले डेबिट कार्ड एटीएम मशीनमध्ये टाकताच कोणतीही माहिती न भरताच मशीनमधून थेट २० हजार रुपयांची रोकड बाहेर आली.

आपल्या बँक खात्यात इतकी रक्कम शिल्लक नाही, हे त्यांना माहिती होते. त्यामुळे ही रक्कम पाहून ते घाबरुन गेले. त्यांनी तेथून १०० क्रमांकावर फोन करुन पोलिसांना हे कळविले. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जगदीश गावित व त्यांचे सहकारी तेथे आले. त्याने ही रक्कम प्रामाणिकपणे पोलिसांच्या हवाली केली. त्याचा हा प्रामाणिकपणा पाहून पोलिसांनी डोंगरे याचे कौतुक केले.

Visit : Policenama.com