… आता उरला फक्त वाहून गेलेल्या संसाराचा पंचनामा!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पर्वती भागातील मुठा कालव्याची भिंत कोसळली. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने रस्त्यांवर महापूर आल्यासारखे चित्र पहायला मिळाले. पर्वती टेकडीच्या पायथ्यापासून मोठ्या वेगाने वाहणारे पाणी रस्त्यावर आणि दांडेकर पूल परिसरातील बैठ्या घरांमध्ये शिरले. थेट घरांत पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने अनेक घरे वाहून गेली. या ठिकाणीचा पंचनामा करण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरु होते. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे हे काम थांबवण्यात आले असून उद्या सकाळी पुन्हा पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e3bc1d59-c26d-11e8-8772-8d7e8f1b3ae1′]
मुठा कालव्याची  भिंत कोसळल्याने ३५ ते ४० फुट उंचीवरुन पाणी बाहेर फेकले गेले. त्यामुळे प्रचंड वेगात वाहणारे हे पाणी काही क्षणात जनता वसाहतमधील घरांमध्ये शिरले. त्यामुळे काही घरांना तडे गेले तर काही घरे वाहून गेली. यामुळे परिसरात एकच हाहा:कार उडाला. परिसरातील ३०० ते ४०० घरांना नुकसान झाले तर अनेक घरे वाहून गेली. वाहून गेलेल्या घरांचा आकडा अद्याप समजू शकला नसला तरी अनेक नागिरीक बेघर झाले आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरु केले आहे. १२५ पंचनामे झाले असून सायंकाळी आलेल्या पावसामुळे हे काम थांबवण्यात आले आहे. उद्या सकाळी हे काम पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे स्थानिक नगरसेवक आनंद राठी यांनी पोलीसनामाशी बोलाताना सांगितले.
[amazon_link asins=’B07D9G1GHB,B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f0fd83ea-c26d-11e8-8ad5-4fd7dd037834′]
पाण्याच्या प्रेशरमुळे घराच्या भिंती कोसळल्या आहेत. अनेकांचे कौटुंबीक साहित्य उद्धवस्त झाले आहे. अचानक घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना काय होत आहे हे कळालेच नाही. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की काही समजायच्या आत संपूर्ण घर पाण्यात गेले. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने अंदाज येईपर्यंत नुकसान झाले. घरातील सर्व सामानाची नासधुस झाल्याने नागरिकांनी आहेत्या स्थितीत घरातून बाहेर पडावे लागले. सध्या त्यांच्याजवळ अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीच उरले नाही. या घटनेमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले तर काहींचे स्वप्न पाण्यात वाहून गेली. या दुर्घटनेत किती रुपयांचे नुकसान झाले हे समजू शकले नाही.
बेघर झालेल्या नागरिकांसमोर सध्या राहण्याचा आणि जेवणाचा गंभीर प्रश्न आहे. शहरातील अनेक सामाजीक संस्था, एनजीओ, स्थानिक नगरसेवकांनी या लोकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केली आहे. महापालिकेच्या शाळेत, परिसरातील शाळांमध्ये या नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. आजच्या या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना पानशेतच्या दुर्घटनेची आठवण झाली. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे दैव बलवत्तर होते असेच म्हणावे लागेल कारण हीच घटना रात्री घडली असती तर कदाचित चित्र वेगळे असले असते. सध्यातरी या नागरिकांना धिराची आणि मदतीची आवश्यकता आहे.