पत्नीच्या चेहऱ्यावर सिगारेटचा धूर सोडणाऱ्यास व्हॉट्सअ‍ॅपद्वारे नोटीस

धामणगाव रेल्वे (अमरावती) : पोलीसनामा ऑनलाईन – चारित्र्याच्या संशयावरुन छळ करणाऱ्या उच्चशिक्षीत दारुड्या पतीने पत्निच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडला. दारुड्या पतीला धामणगाव न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी नोटीस पाठवली. न्यायालयाने ही नोटीस पोस्टाने पाठवली नाही तर व्हॉट्सअॅपद्वारे पाठवली. या नोटीसमध्ये पतीला १४ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथे राहणाऱ्या एका महिलेचा अमरावती येथील प्रीतेश देशमुख याच्या सोबत जून २०१८ मध्ये विवाह झाला होता. प्रीतेश हा ओमानची राजधानी मस्कत येथे मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्याला लग्नाच्या आगोदरपासून दारुचे व्यसन होते.

विवाहानंतर तो चेहऱ्यावर सिगारेटचा धूर सोडून छळ करीत होता. ‘तू बायको म्हणून मला पसंत नाहीस’ असे तिला सांगत होता. तसेच त्याने १० लाख रुपये व मोबाइल फोनची मागणी तिच्याकडे केली होती. या छळाला कंटाळून पीडित महिलेने धामणगाव येथील संरक्षण अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांनी लेखी जबाब नोंदवून दिवाणी व फौजदारी न्यायालय धामणगाव येथे हे प्रकरण दाखल केले.

Loading...
You might also like