डॉ. सुजय विखेंच्या अडचणीत वाढ ; पेड न्यूज प्रकरणी नोटीस

48 तासांत खुलासा सादर करण्याचे समितीचे आदेश

अहमदनगर : पोलीसनामा आँनलाईन – शिर्डी येथील एका स्थानिक लोकल केबल नेटवर्कवर ‘डॉ. सुजय विखे होणार केंद्रात मंत्री’ या आशयाची एकांगी आणि एकाच उमेदवाराला लाभ होईल आणि एकच उमेदवार जिंकेल अशी शक्यता वर्तविणारी बातमी प्रसारित झाल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समितीने नोटीस बजावली आहे. सदर बातमी प्रसारित करण्यास आपली अनुमती होती किंवा कसे, याबाबत 48 तासांत खुलासा करावा अन्यथा सदर वृत्त पेड न्यूज म्हणून का गृहित धरु नये आणि त्याचा खर्च आपल्या निवडणूक खर्चात का समाविष्ट करण्यात येऊ नये, अशी विचारणा समितीने केली आहे. समितीचे अध्यक्ष तथा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही नोटीस बजावली आहे.

माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून वृत्तपत्रात येणार्‍या बातम्या आणि वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांवर लक्ष ठेवले जात आहे. एकाच स्वरुपाच्या, एकांगी आणि एकाच उमेदवाराचा प्रभाव मतदारांवर पडावा, या अनुषंगाने आलेल्या बातम्या पेड न्यूज म्हणून मानल्या जातात. त्याच अनुषंगाने माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती काम करते.

नुकतेच शिर्डी येथील एस ९ या लोकल केबल नेटवर्कवरुन ‘डॉ. सुजय विखे होणार केंद्रात मंत्री’ या आशयाची बातमी त्यांच्या श्रीरामपूर येथील प्रतिनिधीने प्रसारित केली होती. सदर बातमी यु ट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आली होती. सदर वृत्तातील मजकूर हा एकांगी असल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय, सदर लोकल केबल नेटवर्कसाठी बातमी प्रसारणाचा परवाना आहे का, ज्या उमेदवाराशी संबंधित ही बातमी एकांगी स्वरुपाची आहे, त्यांच्या पूर्वसंमतीने ही बातमी प्रसारित करण्यात आली आहे का अशी विचारणा समितीने या लोकल केबल नेटवर्ककडेही केली असून त्यांना २४ तासांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.