‘कोरोना’मुळे 3500 कोटींच्या निधी उभारणीचा राज्य सरकारचा निर्णय

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे राज्याच्या उत्पन्नाचा ओघ घटल्याने खर्च भागविण्यासाठी राज्य सरकारने कर्जरोख्यांचा आसरा घेतला आहे. अल्प व दीर्घ मुदतीच्या कर्जरोख्यांच्या विक्रीतून 3500 कोटी रुपये उभे करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, हे पैसे विकासकामांवर खर्च करण्यात येणार आहेत.

लॉकडाउनमुळे उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक उलाढालीचे चक्र थांबले. त्यामुळे राज्य सरकारच्या उत्पन्नाचा प्रमुख मार्ग असलेल्या वस्तू व सेवा कराचा महसूल कमी झाला. कायद्याप्रमाणे त्याची भरपाई केंद्र सरकारने द्यायची असते. पण या नुकसानभरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जुलै 2020 पर्यंत 22 हजार 534 कोटी रुपये येणे बाकी आहे. आता सप्टेंबर संपत आला तरी महसुलाचा ओघ म्हणावा तसा सुरू होत नसल्याने राज्यातील तिजोरीवरील ताण वाढतच आहे.

केंद्राकडे थकबाकी वाढतच चालल्याने सरकारच्या विविध कामांसाठी पैसे कुठून आणायचे या विवंचनेत सरकार आहे. निधीची काही प्रमाणात तरतूद करण्यासाठी सरकारने कर्जरोख्यांच्या विक्रीचा आधार घ्यायचे ठरवले आहे. त्यानुसार एकूण 3500 कोटी रुपयांच्या कर्जरोख्यांची विक्री करण्यात येणार आहे. दीड हजार कोटींचे कर्जरोखे दोन वर्षांच्या कालावधीसाठी असतील. त्यावर 4.45 टक्के व्याज असेल, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.