तडीपारीच्या काळात शहरात आलेल्या गुंडाला १ वर्षाची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तडीपार केलेले असताना शहरात येऊन साथीदारांसोबत दरोड्याच्या तयारीत असताना पकडलेल्या सराईत गुंडाला न्यायालायने तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकऱणी १ वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सुशांत उर्फ मट्या शशिकांत कुचेकर (रा. नानापेठ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे,

सुशांत उऱ्फ मट्या शशिकांत कुचेकर याला शहरातून तडीपार करण्यात आले होते. तडीपार असतानाही तो आदेशाचे उल्लंघन करून शहरात आला. त्याच्या साथीदारांसोबत मिळून तो लडकत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी समर्थ पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नितीन अतकरे यांनी तपास करून १० एप्रिल रोजी त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी त्याला तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ वर्ष साधी कैद आणि २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.