सराईत, तडीपारासह हिंदू राष्ट्र सेनेच्या पाच जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – खुनाच्या गुन्ह्यातील फऱार सराईत, तडीपार आऱोपीसह हिंदूराष्ट्र सेनेच्या सहा जणांच्या हडपसर पोलिसांनी मुसक्य़ा आवळल्या आहेत. पाच जण धनंजय देसाईच्या येरवडा कारागृहातून सुटकेनंतर मिरवणूक काढल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आहेत.

संदिप उर्फ सोन्या सोपान डांगमाळी (२९, हडपसर) हा खून केल्याप्रकऱणी फरार असलेला सराईत असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर आकाश प्रकाश काकडे (२८, ससाणे नगर हडपसर) हा तडीपार असतानाही पुण्यात वावरत असताना त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

तर विशाल सुतरावे (२५, काळेपडळ, ह़डपसर), वैजनाथ अरुण भगत (३५, मांजरी), संचित सुरेश काळे (२४, काळेपडळ), विनायक पांडुरंग बेलसरे (२४, लोणी काळभोर), प्रकाश सुग्रीव साठे (२४, मांजरी फार्म) अशी अटक करण्यात आलेल्या हिंदू राष्ट्र सेनेच्या सहा संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व कर्मचारी अमित कांबळे यांना माहिती मिळाली की, खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी संदिप डांगमाळी हा त्याच्या १० ते १५  साथीदरांसह तुळजापूर येथे जाण्यासाठी निघाला आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यांचा पाठलाग केला. तेव्हा ते उरुळी कांचन येथे हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबले. पोलिसांनी हॉटेलला चारी बाजूंनी वेढले. त्यानंतर त्यांना जागीच थांबवून ताब्यात घेतले.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, कर्मचारी अमित कांबळे, शाहिद शेख, नितीन मुंढे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अकबर शेख, शशिकांत नाळे यांच्या पथकाने केली.