घटस्फोटीत पत्नीचे अपहरण करून बेदम मारहाण

पोलीसनामा ऑनलाईन – कुख्यात साहिल सैयदला (sahil syed) गुन्हे शाखेने घटस्फोटित पत्नीचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याला तीन दिवसाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार(Commissioner of Police Amitesh Kumar) यांनी या प्रकरणाची दखल घेतली. चार महिन्याने प्रकरणाची कारवाई झाली.

दरम्यान, जुलै महिन्यात ॲलेक्सिस हाॅस्पिटल प्रकरण पुढे आले. त्या प्रकरणात साहिल चर्चेत आला होता. त्याने मनपाचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार, आपली पत्नी नीलिमा, भाऊ आणि सहकाऱ्यांच्या मदतीने ॲलेक्सिस हाॅस्पिटलमधील बांधकामाची तोडफोड करून धमकावले होते. हा तपास तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय यांनी गुन्हे शाखेकडे सोपविला होता. त्याच्याविरोधात धोकेबाजी, जमीन हडपणे, मारहाण करणे आदी गुन्हे दाखल होते.

याचदरम्यान पीडित युवतीही न्यायासाठी पुढे आली. साहिलने फसवून तिच्याशी लग्न केले. पीडित युवतीला शारीरिक शोषण करून घटस्फोट दिला होता. नंतर तिचे अपहरण केले. तिला तो सुरेंद्रनगरातील कब्जा केलेल्या घरी घेऊन गेला होता. तिथे नीलिमा जायसवाल, भाऊ आणि साथीदारांच्या मदतीने पीडितेला बेदम मारहाण करण्यात आली होती. काही आक्षेपार्ह गोष्टी कबूल करण्यासाठी मारहाण करून त्याची व्हिडीओ क्लिपिंग तयार केली होती. पीडितेच्या नावाने असलेला फ्लॅटदेखील साहिलने आपल्या नावावर केला होता. या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी साहिलविरुद्ध गुन्हा दाखल केला. तत्कालीन ठाणेदारांनी कारवाईत बरीच चालढकल केली. तो अन्य प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतरही पोलिसांनी त्याला अटक करण्याचे टाळले. यामुळे पीडितेने हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपविण्याची मागणी अमितेश कुमार यांच्याकडे केली होती. ती मान्य होताच मंगळवारी रात्री साहिलला अटक करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असलेल्यांवरील कारवाईसंदर्भात माहिती मिळू शकली नाही.

गुन्हे शाखेकडे आणि एसीबीकडे डॉ. प्रवीण गंटावारच्या विरोधात प्रकरण दाखल आहे, मात्र, अद्याप कसलीही कारवाई झालेली नाही. यामुळे सर्वत्र चर्चेला बरेच उधाण आले आहे. ते अद्यापही मनपात आपल्या पदावर आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी तातडीने कारवाईचे संकेत रविवारी दिले. त्यावर आता काय कृती केली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.