देशातील 6 साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी कुख्यात दहशतवादी डॉ. बॉम्ब मुंबईतून ‘फरारी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरातील ६हून अधिक साखळी बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा आरोप असलेला कुख्यात दहशतवादी डॉ़ बॉम्ब उर्फ जलीस अन्सारी हा मुंबईतून फरार झाला आहे़. अजमेर तुरुंगातून पॅरोलवर सोडण्यात आले असताना तो फरार झाला आहे. ६८ वर्षाचा डॉ़ अन्सारी हा अग्निपाडा परिसरातील मोमीनपुरमध्ये राहणारा आहे़ तो अजमेर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.

मुंबईतील अग्निपाडा पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल झाली आहे़ ९० च्या दशकापासून देशभरात झालेल्या ६ बॉम्बस्फोटामध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे़ तो इंडियन मुजाहिद्दिनशी संबंधित होता़ त्याला काही दिवसांपूर्वी मुंबईतील नातेवाईकांना भेटण्यासाठी पॅरोल देण्यात आला होता. अजमेरच्या तुरुंगातून सुटल्यावर तो मुंबईत आला. शुक्रवारी त्याच्या पॅरोलचा कालावधी संपणार होता. त्यापूर्वीच एक दिवस अगोदर गुरुवारी सकाळी ५ वाजल्यापासून तो बेपत्ता झाला आहे.

ही माहिती त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी अग्निपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. डॉ. अन्सारी हा बेपत्ता झाल्याने महाराष्ट्र पोलीस, एटीएस आणि गुन्हे शाखा तसेच सुरक्षा एजन्सीज याची चिंता वाढली आहे. त्याच्या शोधाला सुरुवात झाली असून गुरुवारी संपूर्ण दिवसभर मुंबईत विविध ठिकाणी छापे घालण्यात आले. मात्र २४ तास उलटून गेल्यानंतरही डॉ़ अन्सारी सापडू शकला नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like