Yavatmal : 2 वर्षापासून फरार कुख्यात गुन्हेगाराला कल्याणमधून अटक, वडापावच्या गाडीवर करत होता काम

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन –   मोबाइलच्या किरकोळ वादातून वाघापूर येथील चौकात 2019 मध्ये विनय राठोड या युवकाचा खून झाला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी वीरेंद्र उर्फ वीरू अशोक कोल्हे याला लोहारा पोलिसांनी कल्याणमध्ये शिताफीने अटक केली. राठोड याचा खून केल्यानंतर आरोपी कोल्हे हा फरार झाला होता. मागील दोन वर्षापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

कुख्यात गुंड विरू कोल्हे याच्यावर खूनाचे तीन गुन्हे दाखल आहे. गुन्हा केल्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देऊन फरार होत होता. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यात तो तरबेज होता. 2019 पासून वाँटेड असलेल्या वीरूचा कुणालाच थांगपत्ता लागत नव्हता. लोहारा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मीलन कोयल यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी वीरूचा तांत्रिक पद्धतीने शोध सुरु केला.

लोहारा येथे बदलून येण्यापूर्वी मीलन कोयल या मुंबई येथे कार्यरत होत्या. मुंबईतील आपले नेटवर्क वापरुन त्यांनी कोल्हे याचा शोध घेतला. आरोपी कोल्हे याला कल्याण पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. आरोपी विरु याच्यावर 2014 मध्ये शहर पोलीस ठाणे, 2018 मध्ये अवधुतवाडी पोलीस ठाण्यात खूनाचे गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर 2019 मध्ये लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची मोस्ट वाँटेड गँगस्टर म्हणून पोलीस दप्तरात नोंद करण्यात आली.

वडापावच्या गाडीवर काम करायचा

खुनाच्या घटनेनंतर आरोपी विरु कोल्हे हा फरार झाला होता. तो कल्याण परिसरात एका वडापावच्या गाडीवर काम करत होता. त्याने तेथील एका मिलमध्ये रात्रपाळीचे काम मिळवले होते. तो पोलिसांनी चकवा देण्यासाठी ओळख लपवून या ठिकाणी रहात होता. अखेर लोहारा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.