काय सांगता ! होय, ‘या’ पुस्तकामध्ये 40 वर्षापुर्वीच करण्यात आली होती ‘कोरोना’ व्हायरसची ‘भविष्यवाणी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत १७०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या वुहान शहरापासून सुरुवात झालेल्या भयानक कोरोना व्हायरसचा संसर्ग २५ पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. परंतु आपल्याला हे माहित नसेल की, ४० वर्षाआधीच या व्हायरसची भविष्यवाणी एका पुस्तकात करण्यात आली होती.

१९८१ मध्ये एक ‘द आइज ऑफ डार्कनेस’ नावाची थ्रिलर कादंबरी लिहिली गेली होती. ज्यात वुहान-४०० नावाच्या एका व्हायरसचा उल्लेख करण्यात आला होता. डियान कूंट्ज यांच्या या कादंबरीत एका लॅबमध्ये जैवशस्त्रास्त्र बनविण्याच्या प्रयत्नात एक व्हायरस जन्माला येतो.

https://twitter.com/DarrenPlymouth/status/1229110623222554626

@DarrenPlymouth नावाच्या एका ट्विटर हॅन्डलवरून एक ट्विट करण्यात आले, यानंतर सोशल मीडियावर हे पुस्तक चर्चेचा विषय बनले आहे. युजरने या पुस्तकाचे कव्हर देखील पोस्ट केले असून या पुस्तकातील वुहान-४०० नावाच्या व्हायरसचा उल्लेख असणाऱ्या भागाला देखील शेअर केले.

ट्विट मध्ये लिहिण्यात आले आहे की, आपण एक विचित्र जगात वास्तव्य करत असून अशा कथा काही वेळेस खूप धक्कादायक ठरू शकतात. तसेच सोशल मीडियावर लोकांनी आश्चर्य व्यक्त केले की ४० वर्षाआधीची एक कथा आता वास्तवात बदलत आहे.

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी देखील पुस्तकाचा एक पॅराग्राफ शेअर केला आणि लिहिले, काय कोरोना व्हायरस हे एक जैव-शस्त्र वुहान-४०० आहे, ज्यास चीनने विकसित केले आहे? हे पुस्तक १९८१ मध्ये प्रकाशित झाले होते, आपण त्याचे उतारे वाचू शकता.

जगभरातील विश्लेषक देखील ही शंका व्यक्त करत आहेत की कोरोना व्हायरस बद्दल चीन काहीतरी लपवत आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की कोरोना व्हायरस चीनच्या लॅबमधून पसरला असून चीन एक जैव-शस्त्र बनवत असताना हा सगळा प्रकार घडला आहे असे सांगण्यात येत आहे. परंतु चीनच्या सर्व शास्त्रज्ञांनी हा दावा फेटाळून लावला असून त्याचे कारण नैसर्गिक असल्याचे स्पष्ट केले आहे.