आता ATM मधून 2000 च्या नोटा निघणार नाहीत, जाणून घ्या अर्थमंत्र्यांनी काय सांगितलं ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकांच्या एटीएम (ATM) मधून आता २ हजारच्या ऐवजी ५०० रुपयांच्या नोटा जास्त प्रमाणात निघत आहेत. असे मानले जात आहे की हळू – हळू २ हजाराची नोट व्यवहारातून बंद करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मागितलेल्या माहितीला उत्तर देताना म्हटले होते की केंद्रीय बँकेने २ हजारांच्या नोटा छापणे बंद केले आहे. सूत्रांनी बुधवारी सांगितले की अर्थ मंत्रालयाकडून या संदर्भात कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. बँकेने स्वत:च एटीएममध्ये छोट्या नोटा ठेवण्यास सुरुवात केली आहे जेणेकरुन ग्राहकांना सुविधा मिळावी. काही बँकांनी लहान नोटांनुसार आपले एटीएम पुन्हा कॅलिब्रेट करण्यास सुरुवात केली आहे. इतर काही बँका देखील या प्रकारचे पाऊल उचलू शकतात.

इंडियन बँकेने एटीएम मध्ये २ हजार रुपयांच्या नोटा टाकणे केले बंद
सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने म्हटले आहे की त्यांनी आपल्या एटीएममध्ये २ हजारांच्या नोटा टाकणे बंद केले आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की २ हजाराच्या नोटला सुट्टे करणे फार अवघड असते. यामुळे बँकांनी एटीएममध्ये दोन हजारांच्या नोटा टाकणेच बंद केले आहे.

देशभरात सुमारे २,४०,००० एटीएम आहेत, ज्यांना पुन्हा कॅलिब्रेट करण्यासाठी जवळपास १ वर्षाचा कालावधी तरी लागेल. आता २ हजाराच्या नोटांची छपाई जवळजवळ बंदच करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार २ हजाराच्या नोटांना अजून तरी एटीएममधून हटवण्याची सूचना देण्यात आलेली नाही. कॅश मॅनेजमेंट सिस्टमच्या सुधारणेसाठी बँकांना याचा निर्णय घ्यावा लागेल.

RBI ने २ हजारांच्या नोटांची छपाई केली बंद
रिझर्व्ह बँकेने आरटीआयवर दिलेल्या उत्तरात असे म्हटले आहे की २०१६ – १७ च्या दरम्यान २ हजार रुपयांच्या जवळपास ३५४. २९ कोटी नोटा छापल्या गेल्या. नंतर ही संख्या २०१७ – १८ मध्ये ११. १५ कोटी आणि २०१८ – १९ मध्ये ४. ६६ कोटींवर आली आहे. यातून असे संकेत मिळतात की मोठ्या मूल्याच्या २ हजाराच्या नोटा वैध राहतील परंतु हळूहळू यांना हटविण्यात येईल.