काय सांगता ! होय, आता Amazon वरून बुक करता येणार गॅस सिलिंडर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर (Gas Cylinder) बुक करण्यासाठी आता आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. आता ग्राहक चक्क ॲमेझॉनवरून (Amazon) गॅस सिलेंडर बुक करू शकणार आहेत. ॲमेझॉन इंडियानं हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited) सोबत करार केला आहे. त्यानुसार आता HP कंपनीचा गॅस सिलेंडर ग्राहकांना ॲमेझॉनवरून पैसे भरून घेता येणार आहे.

त्यामुळं आता ग्राहकांना IVR च्या माध्यमातून सिलेंडर बुक करण्याची गरज नाही. सिलेंडर बुक करायचा असल्यास थेट ॲमेझॉनच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. ॲमेझॉन पे टॅबवर जाऊन बुकिंग करावं लागेल. त्यानंतर कोणत्याही डिजिटल मोडचा वापर करून पैसे देता येतील. आम्ही डिजिटल पेमेंटमध्ये सातत्यानं नवनवीन अनुभव आणण्याचा प्रयत्न करत आहोत अशी माहिती ॲमेझॉन पे (Amazon Pay) चे सीईओ महेंद्र नेरूरकर यांनी दिली आहे.

ॲलेक्सा आणि फायर टीव्ही स्टिक या तंत्रज्ञानाच्या मदतीनंही ग्राहकांना सिलेंडर बुक करता येणार आहे. मात्र HP गॅस कंपनीच्या ग्राहकांनाच ही सुविधा देण्यात आली आहे आणि त्यांनाच ॲमेझॉनवरून सिलेंडर बुक करता येणार आहे. घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीचे नियम बदलले आहेत. सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी कंपन्यांकडून ही डिलिव्हरी सिस्टीम लागू करण्यात आली आहे. नव्या सिस्टीमला DAC असं नाव देण्यात आलं आहे. त्याचा अर्थ डिलिव्हरी ऑथेंटीकेशन कोड असा आहे.

ॲमेझॉनवरून असा बुक करा सिलेंडर
सर्वात आधी ॲमेझॉन पे टॅबवर जा.

LPG कॅटेगरीवर क्लिक करा.

तुमचा नोंदणीकृत मोबाईल नबंर किंवा HP गॅसचा 17 अंकी नंबर टाका.

ग्राहकांच्या मोबाईलवर कंफर्म करण्यासाठी एक मेसेज येईल. तो कंफर्म करताच तुमचा सिलेंडर बुक होईल.

ॲमेझॉन पेमेंटच्या सहाय्यानं पैसे भरल्यास ग्राहकांना 50 रुपयांचा कॅशबॅकही मिळेल.