औरंगाबाद शहरामधून काँग्रेस हद्दपार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने औरंगाबाद शहरामधून काँग्रेस हद्दपार झाले आहे. पैठणमधून आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय वाघचौरे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर आता औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश गायकवाड यांचाही अर्ज बाद झाला आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शहरातून प्रथमच काँग्रेसच्या अधिकृत चिन्हावर निवडणुकीत उमेदवार नसल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. तांत्रिक त्रुटीमुळे अर्ज बाद केल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या निर्णयाविरोधात गायकवाड यांनी न्यायालयात दाद मागितली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद शहरात पूर्व व पश्चिम आणि मध्य असे तीन मतदारसंघ आहेत. त्यापैकी काँग्रेसकडे औरंगाबाद पूर्व व पश्चिम तर मध्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येत होते. मात्र यावर्षी पूर्व मतदारसंघ समाजवादी पक्षाला आघाडीच्या जागावाटपात सोडण्यात आला. मध्य राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे. पश्चिममधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) चे प्रदेशाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांना काँग्रेसने अधिकृत उमेदवारी दिली आहे.

राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकासांठी 5 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात 798 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज नाकारण्यात आले आहेत. अर्ज छाननीत 4,739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. 7 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. राज्यातील विधानसभेच्या निवडणुका 21 ऑक्टोबरला एका टप्प्यात होणार असून 24 ऑक्टोबर रोजी निकाल लागणार आहेत.

Visit : Policenama.com