Coronavirus : ‘सौम्य’ आणि ‘मध्यम’ लक्षणं असलेल्या ‘कोरोना’ रुग्णांवर आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथीद्वारे करण्यात येणार उपचार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. या टास्क फोर्समधील विविध शाखेतील तज्ज्ञांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवरील उपचारांविषयी निर्णय घेतले जातात. या पार्श्वभूमीवर राज्यातील आयुष टास्क फोर्सने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून राज्य सरकारकडून कोरोना रुग्णांवर आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून या संदर्भातील प्रमुख मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले.

राज्य सरकारकडून कोरोना रुग्णांसाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहे. असे असतानादेखील या आजारावर अजून प्रभावी औषध आलेलं नाही. हे लक्षात घेता आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी डॉक्टरांकडून व विविध संघटनांकडून कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधांचा वापर करू देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती त्यानुसार, टास्क फोर्सने सूचविलेल्या मार्गदर्शक सूचनांना राज्य सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे. आयुष टास्क फोर्सचे सदस्य डॉ. जसवंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधे हे मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करते. त्यामुळे या मार्गदर्शक सूचनांनुसार डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे.

सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथीने सुद्धा या उपचारांना मान्यता दिली आहे.अ‍ॅलोपॅथी उपचार प्रक्रिया सुरू असताना या औषधांचीही मदत घेता येईल. या उपचार पद्धतीची विशेष बाब म्हणजे प्रत्येक रुग्णाच्या लक्षणांनुसार यात औषधांचा समावेश आहे.या उपचार पद्धतीचा सौम्य किंवा मध्यम लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार केल्यास रुग्ण गंभीर स्थितीत जाणार नाही किंवा भविष्यात त्याच्या जीवाला निर्माण होणार धोखा कमी होतो.