आता 2 हजारात CT Scan, राज्य सरकारनं निश्चित केले दर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारनं खासगी रुग्णालये आणि तपासणी सेंटरवरील सिटीस्कॅनचे दर निश्चित केले आहेत. त्यामुळं आता 2-3 हजार रुपये केवळ रुग्णांकडून आकारता येतील. जर कुणी यापेक्षा जास्त दर आकारत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

कोविड, नॉन कोविड रुग्णांच्या अचूक निदानासाठी सिटीस्कॅन आवश्यक असतं. यासाठी अवाजवी दर आकारले जात असल्याच्या तक्रारी होत्या. सरकारनं याची दखल घेत राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीचा अहवाल सरकारनं मान्य केला. 16 स्लाईडपेक्षा कमी सिटीस्कॅनसाठी 2000, 16 ते 64 स्लाईडच्या सिटीस्कॅनसाठी 2500, तर 64 स्लाईडपेक्षा जास्त सिटीस्कॅनसाठी 3000 रुपये आकारता येणार आहेत.

या रकमेत सिटीस्कॅन तपासणी, अहवाल, डिसइन्फेक्टन्ट, पीपीई किट, सिटी फिल्म, सॅनिटायजेशन, जीएसटी यांचा समावेश असेल. हे दर नियमित व तातडीच्या तपासणीसाठी समान असून आदेश निघाल्यापासून लागू होतील. तपासणी अहवालात कोणत्या सिटीस्कॅनद्वारे तपासणी केली आहे हे नमूद करणं बंधनकारक असेल. ज्या रुग्णांकडे आरोग्य विमा आहे किंवा रग्णालय, कार्पोरेट संस्थेनं अशा तपासणी केंद्राशी संबंधित करार केला असेल तर हे दर लागू राहणार नाहीत.