‘आता महाराष्ट्रातील विद्यार्थीदेखील असुरक्षित’, पुण्यातील कार्यालयाला काळं फासल्यानंतर ABVP ची प्रतिक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जेएनयुच्या विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचे सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात पडसाद उमटताना दिसत आहेत. पुण्यातल्या टिळक रोडवरील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यालयाच्या बोर्डला राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्याची घटना घडली. जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून राष्ट्रवादीने हे आंदोलन केल्याचं समजत आहे. यानंतर आता एबीव्हीपीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाही आणि संविधान न मानणाऱ्यांनी हे कृत्य केलं आहे. महाराष्ट्रातला विद्यार्थीही सुरक्षित नाही असंही एबीव्हीपीने म्हटलं आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री अनिल ठोंमरे पोलीसनामाशी बोलताना म्हणाले, “लोकशाहीला विरोध करणाऱ्या आणि संविधान मान्य नसणाऱ्यांकडून हे कृत्य करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते हे कार्यालयातील विद्यार्थ्यांना माराहण करण्यासाठी आले होते. त्यांना हल्ला करायचा होता परंतु कार्यालयात विद्यार्थी नसल्याने त्यांनी कार्यालयाच्या बोर्डला काळ फासलं. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्यानंतर 26/11 ची आठवण आल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. परंतु आता मला असं वाटत आहे की, महाराष्ट्रातला विद्यार्थीदेखील सुरक्षित नाही”

एबीव्हीपीच्या बोर्डला काळं फासताना यावेळी राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी अनेक घोषणा दिल्या. एबीव्हीपी हाय हाय असे म्हणत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधातही कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

जेएनयू विद्यार्थ्यांवरील हल्ल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. नाशिकमध्येही राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावर धडक दिली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/