आता हज यात्रेकरू पुण्यातून उड्डाण घेऊ शकतात, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथूनच हजयात्रोकरू उड्डाण घेऊ शकतात. पश्चिम महाराष्ट्रातील हज यात्रेकरूंना मुंबई येथे जावे लागते. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. येथील यात्रेकरूंना पुण्यातूनच जाता यावे, यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला आहे. त्याला लवकरच मान्यता मिळेल. पश्चिम महाराष्ट्रातील हज यात्रेकरू पुण्यातून उड्डाण घेतील, असा विश्वास अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. मंत्रिपदी निवड झाल्याने खुद्दाम-ए-हुज्जाज-(हज) कमिटीच्या वतीने नवाब मलिक यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.एन.वाय. काझी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर अजम पानसरे, राज्य हज कमीटीचे समन्वयक शेख इब्राहिम भाईजान, खुद्दाम-ए-हुज्जाज-(हज) कमिटीचे पुणे शहर अध्यक्ष रियाज इस्माईल काझी, राज्य कमीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी, डॉ. पी. ए. इनामदार, भाईजान काझी, नगरसेवक फारूक इनामदार,हसीना इनामदार ,माजी नगरसेवक राईस सुंडके,अनिस सुंडके, ऑल कोंढवा सोसिएल फाउंडेशन संस्थापक हाजी फिरोज शेख,झुबेर बिल्डर, मुफ्ती राईस आदी उपस्थित होते.

मलिक म्हणाले, शहरात हज हाऊसची आवश्यकता असून, कोंढव्यात बांधकाम सुरु आहे. परंतु ते अपुरे पडण्याची शक्यता आहे. कारण पुणे, पश्चिम महाराष्ट्रातून हजला जाणार्‍या यात्रेकरुंची संख्या मोठी आहे. त्यामुळे हज हाऊसचे मोठे बांधकाम करण्याची गरज आहे. यासाठी पुणे महापालिकेने निधी उपलब्ध करुन द्यावा, जर महापालिकेने निधी उपलब्ध करुन न दिल्यास राज्य शासनामार्फत निधीची तरतूद केली जाईल, असेही ते म्‍हणाले.

राज्यात अस्तित्वात असलेल्या हज हाऊसचा वापर हज यात्रेकरूंसाठी केवळ 15 दिवसचं होत असतो. त्यानंतर त्या इमारती वापराविना पडून असतात. त्यामुळे भविष्यात या इमारतींमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय आयोगाची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्याचा विचार सुरु आहे, असे मलीक यांनी सांगितले.

कार्यक्रमास खुद्दाम-ए-हुज्जाज-(हज) कमीटीचे सचिव सईद खान, सदस्य हसन शेख, बासित शेख, म्हैबुब शेख, मुन्ना भाई, मन्सूर काझी, सुफीयान काझी, मुनाफ सैय्यद, उस्मान सैय्यद, मोहम्मद साहेब चाचा,रफिक चाचा, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

वक्फ बोर्डाच्या जमिनी अतिक्रमण मुक्त करणार
राज्यात मशिद व दर्ग्याच्या नावाने सुमारे 1 लाख हेक्टर जमीनी असून, त्यापैकी सुमारे 60 टक्के जमिनिवर अतिक्रमण करण्यात आले आहे. वक्फ बोर्ड स्थापन झाल्यापासून एकही अधिकारी पूर्णवेळ नेमला गेला नाही. त्यामुळे कामकाजात पाहिजे त्या प्रमाणात गती आली नाही. पूर्णवेळ अधिकारी नेमून ज्या ठिकाणी अतिक्रम आहे, त्या ठिकाणचे अतिक्रमण काढले जाईल. याची सुरुवात उस्मानाबाद येथून होणार आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

यावेळी अल्पसंख्याक खात्याचे मंत्री नवाब मलिक यांच्याकडे केलेल्या मागणीबाबत हाजी रियाज काझी यांनी सांगितले की, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हजसाठी विशेष विमान सेवा सुरु झाली तर पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो लोकांचा त्याचा फायदा होईल कोंढवा येथे उभारण्यात येत असलेल्या हज हाऊसला शासनाकडून २ एकर जागा द्यावी तसेच हज हाऊससाठी ५ कोटींचे अनुदान द्यावे, असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सईद खान यांनी तर आभार बसित शेख यांनी केले.