आणखी एका हिंदुत्ववादी नेत्यावर ‘हल्ला’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात बलिया जिल्ह्यात नाथ संप्रदायाच्या एका महंतावर सोमवारी रात्री हल्ला करण्यात आला. आपल्या गाडीतून जात असताना त्यांच्या वाहनावर काही लोकांकडून दगडफेक करण्यात आली. हल्ल्या दरम्यान वाहनात असलेले एक पुजारी देखील जखमी झाले. सोमवारी रात्री महंत कौशलेंद्र गिरी आपले सहकारी तुन्ना बाबा आपल्या वाहनातून जात असताना मुंदेरा गावात जवळपास 12 जणांनी त्यांना अडवून त्यांच्या वाहनावर दगडफेक केली.

हल्ल्यात महंत देखील जखमी झाले आहेत आणि तुन्ना बाबा देखील जखमी झाले आहेत. त्यांच्या वाहनाचे पूर्णता नुकसान झाले. महंत कौशलेंद्र गिरी हे रसादा क्षेत्रातील एका मठात प्रमुख आहेत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर स्थित गोरक्ष पीठात नाथ संप्रदायाचे प्रमुख आहेत.

पोलीस निरीक्षक सुरेंद्र नाथ यांनी सांगितले की, महंत कौशलेंद्र गिरी यांच्या तक्रारीनंतर अज्ञात हल्लेखोरावर गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी लखनऊमध्ये एक हिंदुत्ववादी नेता रंजीत बच्चन यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.