आता राष्ट्रवादीत ‘साहेबां’कडून होणार ‘झाडाझडती’

शनिवारी मुंबईत बोलावली बैठक

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत काँगेसचा दारुण पराभव झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा मोठ्या प्रमाणात पराभवाची झळ बसली आहे. त्यात काँग्रेस आघाडीचे अपयश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी यामुळे राज्याच्या राजकारणात बॅकफूटवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख नेतेमंडळी शनिवारी विचारमंथन करणार आहेत आणि या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे ‘झाडाझडती’ करणार असल्याचेही बोलले जात आहे.

राष्ट्रवादीला हक्काच्या लोकसभा मतदारसंघातही पक्षाच्या उमेदवाराचा दारुण पराभव नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत शनिवारी (१ जून) बैठक बोलावली आहे.पक्षाचे आजी-माजी खासदार, प्रदेश कार्यकारिणीवरील नेते, आजी-माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महापालिका स्तरावरील शहराध्यक्ष अशा प्रमुख नेतेमंडळींसोबत सद्य:स्थितीसह आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सल्लामसलत करणार आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्षांची आघाडी झाल्यामुळे राज्यात आघाडीचे संख्याबळ २५ ते ३० पर्यंत पोहोचेल असा नेतेमंडळींचा कयास होता आणि राष्ट्रवादीसुद्धा खासदारांची दोन अंकी संख्या ओलांडेल असा विश्वास नेतेमंडळी बाळगून होते. मात्र, राष्ट्रवादीला कोल्हापूर, माढा, नाशिक, हातकणंगले, बीड, मावळ मतदारसंघांत नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. मागील सभागृहात कोल्हापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघांवर राष्ट्रवादीचे खासदार प्रतिनिधित्व करत होते. हातकणंगले मतदारसंघ मित्रपक्ष स्वाभिमानी संघटनेला सोडला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभव सहन करावा लागला.

या पार्श्वभूमीवर पवारांनी पक्षाच्या नेतेमंडळींची बैठक बोलावली आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला ३१ मेपर्यंत लोकसभा निवडणुकीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. तालुकाध्यक्ष, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, नगरपालिका कार्यक्षेत्र अध्यक्ष, राज्य कार्यकारिणीवरील सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचा अहवाल देण्यासाठी सांगितला आहे.