रेल्वे प्रशासनाने घेतला मोठा निर्णय ! आता प्रवाशी रात्रीच्यावेळी मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज करू शकणार नाहीत

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाईन – प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वे प्रवासी रात्रीच्या वेळी मोबाईल, लॅपटॉप चार्ज करू शकणार नाहीत. रेल्वे प्रवासादरम्यान घडणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला असून याचा फटका हजारो प्रवाशांना बसणार आहे.

याबाबत रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले की, रेल्वे प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. रात्री 11 ते पहाटे 5 दरम्यान रेल्वे गाड्यांमधील चार्जिंग पॉईंट बंद राहतील. त्यामुळे प्रवाशांना त्यांचा वापर करता येणार नाही. 13 मार्चला दिल्ली-देहरादून शताब्दी एक्स्प्रेसमध्ये भीषण आग लागली होती. या घटनेनंतर रेल्वेने सुरक्षेच्या दृष्टीन महत्त्वाची पावल टाकण्यास सुरुवात केली आहेत. दरम्यान धुम्रपानासंदर्भातील नियम देखील कठोर केले जाणार आहेत. रेल्वेत धुम्रपान करणाऱ्यांकडून सध्या केवळ 100 रुपये दंड आकारला जातो. हा दंड वाढवण्याचा रेल्वेचा विचार आहे. रेल्वे गाड्या किंवा रेल्वे स्थानकांच्या परिसरात धुम्रपान करणाऱ्यांसाठी थेट तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्याचा विचारदेखील सुरू आहे. बंगळुरू मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे.