आता डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या धोकादायक आजारांपासून तुमचे रक्षण करेल विमा ! IRDA आणतेय विमा पॉलिसी, ‘हा’ होईल त्याचा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) संसर्गजन्य रोगांसाठी विमा पॉलिसी आणण्याची तयारी करत आहे. यासंदर्भात प्रस्ताव तयार केल्यानंतर भागधारकांकडूनही सूचना मागविण्यात आल्या आहेत. डास, टिक्स व माश्यांच्या संसर्गामुळे अनेक रोग पसरतात. डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया हे प्रमुख संसर्गजन्य आजार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) गेल्या वर्षीच्या अहवालानुसार, अशा आजारांमधे 17 टक्के म्हणजे वर्षाकाठी 7 लाखांहून अधिक मृत्यू होतात.

पॉलिसीअंतर्गत एक वर्षाचा विमा
आयआरडीएच्या या आरोग्य विमा योजनेमुळे तुम्हाला डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांवर एक वर्षाचा विमा मिळू शकेल. सध्या तयार केलेल्या प्रस्तावाअंतर्गत ही सुविधा एका वर्षाच्या कालावधीसाठी देऊ शकते. प्रतीक्षा कालावधी 15 दिवसांचा असेल. या विमा पॉलिसीमध्ये डेंग्यू, मलेरिया, फायलेरियासिस, ब्लॅक-अझर, चिकुनगुनिया, जपानी एन्सेफलायटीस आणि झिका विषाणूसारख्या वेक्टर जनित रोगांचा समावेश असेल.

मसुद्यात दिलेल्या माहितीनुसार या प्रोडक्टचे नाव वेक्टर बॉर्न डिसीज हेल्थ पॉलिसी असेल. हे ‘सिंगल प्रीमियम’ प्रोडक्ट असेल, म्हणजे एखाद्याला प्रीमियम एकदाच भरावा लागेल. या प्रीमियम उत्पादनासाठी किमान वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि कमाल वय 65 वर्षे असेल. तसेच, 1 वर्षापासून ते 25 वर्षांपर्यंतचे पालकांवर अवलंबून असणारी मुलेदेखील या अंतर्गत येतील.

या कारणास्तव आरोग्य विमा महत्त्वपूर्ण आहे
पॉलिसी बाजारचे आरोग्य विमा प्रमुख अमित छाबरा म्हणतात की, वेक्टर-जनित रोग लक्षात घेऊन आम्ही येत्या काळात ग्राहकांना मदत करण्याचा प्रयत्न करू. भारतातील डेंग्यू, मलेरिया यांसारख्या वेक्टर-जनित आजारामुळे बरीच लोकसंख्या बाधित आहे. योग्य उपचार न मिळाल्यामुळे बरेच लोक मरतात. पैसे न मिळणे हे उपचार न होण्याचे सर्वांत मोठे कारण आहे. म्हणून अशा रोगांच्या उपचारांसाठी आरोग्य विमा मिळणे फार महत्त्वाचे आहे.