ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्याराजकीय

NDA ला गळती, आता ‘हा’ पक्ष साथ सोडणार; काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत प्रवेश करणार

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष भाजपाची साथ सोडत असल्याचे दिसत आहेत. शिवसेना, अकाली दल, गोरखा जनमुक्ती मोर्चानंतर आता आणखी एक पक्ष भाजपाला रामराम करणार आहे. केरळ काँग्रेस (पी. सी. थॉमस गट) ने रविवारी एनडीएतून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपासाठी हा चौथा धक्का आहे.

आज रविवारी केरळ काँग्रेसचे नेते पीसी थॉमस हे एनडीएतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा करणार आहेत. थॉमस यांनी म्हटले की, एनडीएने दिलेले आश्वासन पाळले नाही. आम्हाला कुठलीही जागा दिली नाही. त्यामुळे एनडीए सोडण्याशिवाय अन्य कुठलाही मार्ग नाही. रविवारी अधिकृत घोषणा केली जाईल. काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांनी यूडीएफमध्ये आमचे स्वागत केले आहे.

मागील काही महिन्यांपासून भाजपाला गळती लागल्याचे दिसत आहे. अलिकडे तर हे सत्र वाढल्याचे दिसत आहे. भाजपासोबत पस्तीस वर्ष असलेल्या शिवसेनेने मागील विधानसभा निवडणुकीनंतर एनडीएची साथ सोडली होती. शिवाय केंद्रातील मंत्रिपद सुद्धा सोडले होते. त्यानंतर शेतकरी कायद्यावरून अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा त्याग केला आणि त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी एनडीएतून बाहेर पडल्याचे जाहीर केले होते.

त्यानंतर बुधवारी पश्चिम बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चाने एनडीएपासून फारकत घेण्याची घोषणा केली होती. दार्जिलिंगमध्ये वेगळ्या राज्यासाठी झालेल्या आंदोलनापासून फरार असलेले गोरखा जनमुक्ती मोर्चाचे प्रमुख बिमल गुरुंग यांनी ही घोषणा केली आहे. केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप गुरूंग यांनी केला आहे.

Back to top button