व्यापारी यापुढे राजकीय पक्षांच्या कोणत्याही बंदमध्ये सहभागी होणार नाहीत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राजकीय पक्षांनी पुकारलेल्या कोणत्याही बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कामर्सनं घेतला आहे. यापुढे आता राजकीय पक्षानं पुकारलेल्या कोणत्याही बंदमध्ये व्यापारी सहभागी होणार नाहीत. कारण राजकीय बंद यशस्वी करण्यासाठी अनेकदा व्यापारी दुकानं बंद ठेवतात. यात पक्षांचा फायदा होतो मात्र व्यापाऱ्यांचं नुकसान होतं.

बंद आणि आंदोलनांमुळे व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं. त्यामुळे व्यापारी संघटनांनी राजकीय बंदमध्ये सहभागी न होण्याचा ठराव मांडला. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सनं यानंतर बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, “आगामी काळात कोणत्याही राजकीय पक्षाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापारी पाठिंबा देणार नाही” असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे पुण्याचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनीही या ठरावाला पाठिंबा दिला आहे.

राज्यात आणि देशात गेल्या काही वर्षांमध्ये बंद आणि आंदोलनांचे प्रकार वाढले आहेत. अनेकदा राजकीय पक्षांकडून व्यापाऱ्यांनी यात सहभागी व्हावं यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो. व्यापारी जरी या बंदमध्ये सहभागी झाले तरीही त्यांचं नुकसान होतं. बंदमध्ये सहभागी झाले नाही तरीही त्यांचं नुकसान होतं. कारण जर व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले नाहीत तर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून दुकानाची तोडफोड होण्याचा धोका असतो. या सगळ्यामुळे त्रस्त झाल्यानं महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सनं राजकीय बंद आणि आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.