दिल्ली सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रासह ‘या’ 5 राज्यांतून येणाऱ्यांना ‘कोरोना’ रिपोर्ट निगेटिव्ह दाखवणं बंधनकारक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राजधानी दिल्लीतही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता यावर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून दिल्लीत येणाऱ्या लोकांना आता कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे नियम पाच राज्यांतील प्रवाशांसाठी लागू असतील. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.

देशातील विविध राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यानंतर विविध राज्यांकडून सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली जात आहे. त्यानंतर आता दिल्ली सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यांतून दिल्लीत येणाऱ्या लोकांना कोरोनासंबंधात RT-PCR (कोरोना रिपोर्ट) दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामध्ये जर कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असला तरच संबंधितांना दिल्लीत प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार, या पाच राज्यांतील नोडल अधिकाऱ्यांना सांगण्यात आले, की त्यांनी त्यांच्या राज्यातून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचा 72 तासांपूर्वी कोरोनाचा RT-PCR चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे निश्चित करूनच संबंधितांना दिल्लीला जाण्याची परवानगी द्यावी.

उत्तर प्रदेश, हरियाणाचा समावेश नाही
दिल्लीच्या शेजारील राज्य असलेले उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यातून दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांना कोरोना रिपोर्ट दाखवणे बंधनकारक नाही. या राज्यातील नागरिक कोणत्याही रिपोर्टशिवाय दिल्लीत प्रवेश करू शकतात. मात्र, महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यांतील नागरिकांना दिल्लीत प्रवेशासाठी रिपोर्ट बंधनकारक करण्यात आले आहे.

महाराष्ट्रासह केरळमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त
भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातील सर्वाधिक रुग्णसंख्या ही महाराष्ट्र आणि केरळ या राज्यात आहे. देशातील रुग्णसंख्येच्या सर्वात जास्त रुग्णसंख्या या दोन राज्यात आहे.