आता आलं PVC आधार कार्ड, नाही भिजणार अन् चालणार वर्षानुवर्ष, घर बसल्या मागवा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आजकाल प्रत्येक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक केला गेला आहे. या व्यतिरिक्त नवीन सिमकार्ड मिळवताना आणि बँकेत खाते उघडताना प्रथम आधार क्रमांक देणे आवश्यक आहे. तसेच, अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून आधार वापरला जातो. मुलांच्या प्रवेशासाठीदेखील आधार कार्ड आवश्यक असते. वास्तविक, युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) आता आधारचे पॉलीव्हिनिल क्लोराईड (पीव्हीसी) कार्ड जारी करत आहे. नवीन आधार कार्ड अगदी एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्डसारखे आहे. जे आपण पाकीटमध्ये सहजपणे ठेवू शकता.

तसेच नवीन पीव्हीसी कार्ड छापण्याची आणि लॅमिनेशनची गुणवत्ता अधिक चांगली असल्याचे यूआयडीएआयने स्वतः म्हटले आहे. हे बरीच वर्षे टिकेल. या व्यतिरिक्त नवीन पीव्हीसी आधार कार्डसह, क्यूआर कोडद्वारे कार्डची सत्यता त्वरित निश्चित होईल. यात कोणतीही तांत्रिक समस्या उद्भवणार नाही. यूआयडीएआयच्या या नवीन पुढाकाराने, प्रत्येकाला यापुढे मोठ्या आकाराचे आधार कार्ड किंवा मुद्रण प्रत ठेवण्याची गरज भासणार नाही. पाकीटातून केवळ पीव्हीसी आधार कार्ड काढा आणि ते सर्वठिकाणी वापरा.

याबाबत यूआयडीएआयने ट्वीटद्वारे माहिती देत म्हटले की, ‘तुमचा आधार आता तुमच्या पाकीटात ठेवू शकाल अशा आकारात आला आहे.’ यूआयडीएआयने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘आता तुम्ही नवीन आधार पीव्हीसी कार्ड मागवू शकता, जे दिसायला आकर्षक आहे आणि बरेच दिवस टिकेल. याशिवाय हे आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसहसुद्धा आहे. सुरक्षेसाठी या नवीन आधारमध्ये एक होलोग्राम, गिलोचे पॅटर्न, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स्ट फीचर्स देण्यात आली आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे पीव्हीसी आधार कार्ड पावसात देखील खराब होणार नाही. नवीन पीव्हीसी कार्डसाठी तुम्हाला यूआयडीएआयला 50 रुपये द्यावे लागतील, त्यानंतर हा आधार तुमच्या घरी पोहोचेल. आपण घरी बसून नवीन पीव्हीसी आधार कॉर्ड ऑर्डर करू शकता.

यासाठी सर्व प्रथम यूआयडीएआयची अधिकृत वेबसाइट (https://uidai.gov.in) उघडा आणि नंतर ‘My Aadhaar Section’ मध्ये ‘Order Aadhaar PVC Card’ ऑर्डरवर क्लिक करा, ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड वर क्लिक करताच आपल्याला 12-अंकी आधार क्रमांक किंवा 16-अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28-अंकी ईआयडी प्रविष्ट करावा लागेल, या तिन्हीपैकी एक प्रविष्ट करावा लागेल. आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर, खाली सुरक्षा कोड किंवा कॅप्चा कोड प्रविष्ट करा. त्यानंतर खाली ओटीपीवर क्लिक करा. त्यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी सबमिट केल्यानंतर खाली दिलेल्या सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर पीव्हीसी कार्डची पूर्वावलोकन प्रत स्क्रीनवर दिसून येईल. ज्यामध्ये आपल्या आधारशी संबंधित तपशील असेल. शेवटी पेमेंटचा पर्याय येईल. त्यावर क्लिक करून आपण सर्व डिजिटल माध्यमाद्वारे 50 रुपये भरू शकता. त्यानंतर आधार पीव्हीसी कार्ड मागविण्यात येईल. काही दिवसांनंतर पीव्हीसी आधार कार्ड स्पीड पोस्टद्वारे आपल्या घरी पोहोचेल.