Coronavirus : लस निर्मितीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा पुढाकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, कोरोना विरोधातील लसींचा तुटवडा भासत असल्याने लसीकरणामध्ये अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने परवानगी दिल्यास हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (HA) कंपनीला कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी मदत करणार असल्याची माहिती पिंपरी चिचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशात पिंपरी चिंचवडमध्ये असलेल्या एचएमध्ये कोरोना प्रतिबंधक लस तयार झाली तर लसींचा तुटवडा कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, महापौर उषा ढोरे, नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली होती.

पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले की, याबाबत प्रस्ताव आला आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास आणि यातून महापालिकेला लस मिळणार असेल तर आर्थिक मदत देण्यास तयार आहोत. परंतु त्यासाठी करार करण्यास सांगितले आहे. याठिकाणी तयार होणारी कोरोना प्रतिबंधक लस पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याची घट घातली आहे. पिंपरी चिंचवडमधील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाल्यानंतरच कंपनीने दुसऱ्यांना लस द्यावी. एचएला लस निर्मितीसाठी मदत करण्यास पालिका तयार असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

केंद्राने मंजूरी दिली तर लस निर्मिती
एचए कंपनीने केंद्र सरकारकडे कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करण्याची परवानगी मागितली आहे. हा प्रश्न आपण केंद्रीय आरोग्य मंत्रालयापर्यंत नेला असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगतले. एचए कंपनीला लस निर्मिती करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.