पुण्यातील कॅन्टोन्मेंट मतदारसंघ ‘आरपीआय’कडे ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीला थोडा अवधी शिल्लक राहिला असून प्रमुख पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पुण्यातील सर्व मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार असून भाजप मित्र पक्षांकडून या मतदारसंघापैकी काही जागांची मागणी करण्यात येत आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधासनभा मतदारसंघावर आरपीआयने दावा केला आहे. मात्र पिंपरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने हा मतदारसंघ आरपाआयकडे येण्याची शक्यता कमी आहे.

आरपीआयने विधानसभा निवडणुकीत राज्यातील दहा जागांची मागणी केली आहे. यामध्ये पुण्यातील वडगाव शेरी आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा समावेश आहे. मुंबईपाठोपाठ या पक्षाची पुणे जिल्ह्यात ताकद आहे. मागच्या निवडणुकीत पिंपरी मतदारसंघामध्ये झालेल्या तिरंगी लढतीत आरपीआयचा निसटता पराभव झाला होता. आरपीआयला पुण्यामध्ये पक्षसंघटना टिकवून ठेवण्यासाठी पक्षाला एक जागा हवी आहे. मागील निवडणुकीमध्ये आरपीआय भाजपसोबत होता. यंदा कॅन्टोन्मेंट मतदारसंघ राखीव असल्यामुळे भाजपने ही जागा द्यावी अशी मागणी आरपीआयच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून भाजपला सर्वात कमी मताधिक्य मिळाले.

भाजप-शिवसेना युती होणार की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. युती केल्यानंतर पुण्यातील सर्व जागा भाजपाने स्वत:कडे ठेवल्यास, शिवसेना आणि आरपीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील नाराजीचा फटका बसू शकतो. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी स्थानिक भाजप नेत्यांवर असणार आहे. पुण्यातील राजकीय सद्यस्थितीची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर मित्रपक्षांना जागा द्यायची का नाही याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –