आ. पडळकरांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावर दानवेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पडळकर यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आली. दरम्यान, आता पडळकरांच्या वक्तव्यावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपली भूमिका मांडली आहे. रावसाहेब दानवे म्हणाले, शरद पवार हे राज्यातील मोठे नेते आहेत. त्यांचं राज्यासाठी मोठं योगदान आहे. पडळकरांनी केलेलं हे विधान योग्य नसून, कोणत्याही जेष्ठ नेत्याबद्दल बोलताना असे विधान करता कामा नये. तसेच पडळकरांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानाशी भारतीय जनता पार्टीचा कोणताही संबंध नाही. ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे. याबाबत आमचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मत मांडत भूमिका स्पष्ट केली आहे. तर आपण अनावधाने हे विधान केले असं म्हणत पडळकरांनी खेद व्यक्त केला आहे.

काय म्हणाले होते पडळकर 
शरद पवार यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाच्या बाबत ते सकारात्मक असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे. तर शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचं वादग्रस्त विधान गोपीचंद पडळकर यांनी यावेळी बोलताना केलं होत. त्यानंतर त्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने या विधानावरुन आक्रमक भूमिका घेतल्यावर भाजपाने पडळकरांचे ते वक्तव्य वैयक्तिक विधान असल्याचं सांगत, त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, असं म्हणत हात झटकले होते.

चीनप्रश्नावर दानवेंनी भूमिका 
गलवान खोऱ्यातील हिंसाचारानंतर भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावावेळी काँग्रेसने विरोधाचे राजकारण न करता सरकारला पाठिंबा दिला पाहिजे. चीनने नेहरुंच्या काळातही हल्ला केला होता, आपण आपल्या देशाच्या लष्करावर विश्वास ठेवला पाहिजे. तसेच मोदी कोणत्याही देशाचे आक्रमण परतवून लावू शकतात, असा विश्वास सुद्धा दानवेंनी व्यक्त केला.