लालपरी ‘या’ नियमांनुसार लवकरच पूर्ण आसन क्षमतेने धावणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राची लाडकी लाल परी म्हणजेच एसटी आता पूर्ण आसन क्षमतेने प्रवास करण्यास सज्ज झाली आहे. एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायजर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाने २० ऑगस्ट पासून ५० टक्के आसन क्षमतेने आंतर जिल्हा वाहतुकीस परवानगी दिली होती.

कर्नाटक आणि गुजरात राज्यात १०० टक्के प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने पूर्णपणे आसन क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. वाहतूक करण्यास वापरण्यात येणाऱ्या बस निर्जंतुक करूनच सोडल्या जातील. लांबच्या प्रवासाठी ज्या बस वापरण्यात येतील त्या बसमध्ये एका आसनावर एक प्रवासी अशी आसन व्यवस्था असणार आहे.

दिवसभरात ५००० बस धावतात
कोरोना संकटात आणि लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर संपूर्ण राज्यात एसटीसेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर राज्यसरकारच्या निर्देशानूसार ती हळूहळू सुरु करण्यात आली होती. आताच्या सद्यस्थितीला ५००० बस राज्यभरात धावतात आणि त्यामधून सरासरी ५ ते ६ लाख प्रवासी वाहतूक करत असतात.