राज्यात पहिल्यांदाच ! आता घर आणि दुकानांदेखील मिळणार Star Rating ‍! करात मिळणार सूट

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारीत उपाययोजना आखून शाश्वत जीवनपद्धती अवलंबिण्यास माझी वसुंधरा अभियान राबवलं जात आहे. हे अभियान राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेत राबवायचं आहे. वर्धा पालिकेनं या अनुषंगानं यात ठराव घेत पालिका क्षेत्रातील घर आणि दुकानांना स्टार रेटींग देत करात सूट देण्याचा एकमतानं ठराव घेतला आहे. यानंतर आता असं करणारी वर्धा ही राज्यातील पहिली पालिका ठरणार आहे.

घरमालक किंवा दुकानदारानं यात दिलेले उपक्रम राबवले तर त्यांना 3, 5 आणि 7 स्टार देण्यात येणार आहेत. या उपक्रमात कंपोस्टींग करणाऱ्या घरांची तपासणी करून 350 रुपये अनुदान देत कपोस्टींग बकेट वापराकरिता 2 टक्के सूट करातून देण्यात येणार आहे. इतकंच नाही तर रेन वॉटर हार्वेस्टींग करणाऱ्या घरांना दीड हजार रुपये अनुदान आणि अतिरीक्त 2 टक्के मालमत्ता करातून सूट देण्यात येणार आहे.

सौर ऊर्जेवर आधारीत पाणी गरम करणारी यंत्रणा किंवा विद्युत निर्मिती करणारी यंत्रणा लावण्याकरिता मालमत्ता करात 2 टक्के सूट व त्यांनी भरलेल्या विकास शुल्काच्या 10 टक्के रक्कम सूट म्हणून परत देण्यात येणार आहे.

घरातून निघणाऱ्या सांडपाणी पुनर्वापरासाठी यंत्रणा लावली तर मालमत्ता करात 2 टक्के सूट देण्यात येणार आहे. घरात 5 किंवा 5 पेक्षा जास्त, 2 मीटर पेक्षा जास्त उंचीचं वृक्ष लावलं तर मालमत्ता करात 2 टक्के सूट दिली जाणार आहे. घरात लॉन किंवा टेरीस गार्डन विकसित केलेलं असणं, घरात छतावरील पाण्याच्या टाकीला वॉटर अलार्म किंवा व्हॉल्व बसवलेला असणं, घरात बॅटरी चलित वाहनाचा किंवा सायकलचा वापर करणं, कमी ऊर्जा खर्च करणारी यंत्रे असणं आदी मुद्द्याच्या आधारे तपासणी अंती अशा घर आणि दुकानांना स्टार रेटींग देत त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

पर्यावरण रूची वाढवण्यासाठी घेणार स्पर्धा

पर्यावरणाप्रति नागरिकांमध्ये रुची वाढावी यासाठी विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. यात पुष्प प्रदर्शनी, दूर्मिळ वनस्पती औषधी प्रदर्शनी, होम गार्डन, परसबाग स्पर्धा, निसर्गपूरक घर स्पर्धा घेण्यात येणार आहे. पालिकेच्या स्मशानभूमी लगत असणाऱ्या जागेवर फुलपाखरू उद्यान उभारणं, पर्यावरण रक्षणाची शपथ देणं या अभियानाची प्रसिद्धी करणं असे अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहे. नगरपरिषद क्षेत्रात मोटार वाहन विरहित दिवस राबवणं, सायकल वापर प्रोत्साहन देण्यासाठी सायकल मॅरथॉनचं आयोजन करणं आदी बाबींचा यात विचार केला जाणार आहे. इतकंच नाही तर शहरात विविध वसाहती तयार करण्यात आल्या आहेत. यात वॉटर हार्वेस्टींग करणाऱ्या वसाहतीला 5 हजार रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे.