रामदास आठवलेंनी सांगितला पूनम महाजनांच्या मतदारसंघावर दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रामदास आठवेल यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. दक्षिण मुंबईवर निशाणा लावून आठवले यांनी ऐनवेळी आपली मागणी बदलण्याची रणनीती आखली आहे. दक्षिण ऐवजी त्यांनी आता  उत्तर-मध्य मुंबई  मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. सध्या पूनम महाजन या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत आहेत. आठवले यांनी हा मतदारसंघ मागितल्याने त्यांच्या पूनम महाजन यांच्या उमेदवारीची मोठी पंचायत होणार आहे.

मुंबईत ५ मार्च रोजी युतीतील घटक पक्षांच्या होणाऱ्या बैठकीत रामदास आठवले या जागेवर अधिकृत दावा सांगणार आहेत. युती होण्याअगोदर रामदास आठवले यांनी दक्षिण मुंबईत उमेदवारी करण्याचे ठरवले होते. मात्र या ठिकाणी शिवसेनेने खासदार राहुल शेवाळे यांच्या उमेदवारीची तयारी सुरु केली आहे. सभा संमेलने घेऊन शिवसेना या मतदारसंघात पुन्हा तयारी करत आहे. याचीच दखल घेऊन युती होताच रामदास आठवले यांनी आपला दक्षिणेकडील मोर्चा उत्तरेकडे वळवला आहे.

रामदास आठवले यांनी पूर्वी प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघात त्यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रामदास आठवले यांनी १९९८ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत याच उत्तर-मध्य मुंबई  मतदार संघातून उमेदवारी करून निवडणूक जिंकली होती. म्हणून त्यांनी आता याच मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यांच्या या दाव्याची पूर्तता युती कडून केली जाणार का ? हे पाहण्यासारखे राहणार आहे. तसेच त्यांची मागणी जर युतीने पूर्ण केली तर पूनम महाजन यांना लोकसभेत जाण्याचा रस्ता दूरापास्त होईल.